नवी दिल्ली, 19 मे : रुग्णालय, पोलीस स्टेशन आणि कोर्टात जाण्यापासून वाचायला हवं, असं अनेकदा म्हटलं जात. जर एकदा हे प्रकरण सुरू झालं, तर ते काही आपला पाठलाग सोडत नाही. केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो. शारिरीक आणि मानसिक त्रासाबरोबर आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागतं. असाच एक अनुभव अमेरिकेतील (America News) महिलेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेने रुग्णालयाचं बिल शेअर करताना सांगितलं की, त्याची बहीण डॉक्टरच्या समोर भावुक झाली आणि रडू लागली. रुग्णालयाच्या व्यवस्थापकांनी अश्रूंसाठी 40 डॉलर म्हणजे तब्बल 3 हजार रुपये वसूल केले. ही घटना केमिली जॉन्सन नावाच्या महिलेशी संबंधित आहे, केमिली लोकप्रिय यूट्यूबर आहे आणि सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने ट्विटरवर बिलची कॉपी शेअर करीत सांगितलं की, माझी बहीण एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. ती तपासणी करण्यासाठी रुग्णालयात गेली होती. तपासादरम्यान ती डॉक्टरांना भेटली. आजाराबद्दल सांगताना ती काही वेळासाठी भावुक झाली आणि डॉक्टरांसमोर रडू लागली. या बिलमध्ये लिहिलं आहे की, विजुअल एक्युटी स्क्रीन तपासासाठी 20 डॉलर, हीमोग्लोबिन तपासासाठी 15 डॉलर वसूल करण्यात आले. पीटी-फोकस्ड एचएलटीएच रिस्क एसेसमेंटसाठी 30 डॉलर, कॅपिलरी ब्लड ड्रासाठी 30 डॉलर देण्यात आले. प्री विजिट इस्टिमेटेड एजसाठी 100 डॉलर घेण्यात आले. याशिवाय ब्रीफ इमोशनल बिहेव एसेसमेंटसाठी 40 डॉलर घेण्यात आले. रुग्णालयात व्यवस्थापनाने माझी बहीण रडण्यामागील कारणाचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला. उलट तिच्याकडून 40 डॉलर वसूल करण्यात आले.
My little sister has been really struggling with a health condition lately and finally got to see a doctor. They charged her $40 for crying. pic.twitter.com/fbvOWDzBQM
— Camille Johnson (@OffbeatLook) May 17, 2022
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत जवळपास पाच लाख लोकांनी लाइक केले आहे. सुमारे 64 हजार लोकांनी ते रिट्विट केले असून सुमारे 16 हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये त्यांचे अनुभव देखील शेअर केले आहेत.