नवी दिल्ली 24 मे: सोशल मीडिया (Social Media) म्हणजे समाजाचं चित्र असतं. कारण समाजाच्या जवळपास सर्व स्तरातले लोक हा मीडिया वापरत असतात. त्यामुळे समाजातल्या चांगल्या गोष्टींप्रमाणेच विरोधाभासांचं, विसंगतींचं चित्रणही यात होत असतं. असाच एक फोटो ट्विटरवर (Twitter) सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक मध्यमवयीन महिला स्वयंपाक करताना दिसते आहे. मात्र विशेष बाब म्हणजे तिच्या नाकाला ऑक्सिजन मास्क (Oxygen Mask) लावलेला असून, जवळ ठेवलेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरमधून (Oxygen Concentrator) त्या महिलेला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या परिस्थितीतही तिला कोणीही मदत करताना फोटोत दिसत नाहीये. ‘Unconditional Love = Mother. She is Never Off Duty’ ‘निरपेक्ष प्रेम म्हणजे आई. ती कायमच ड्युटीवर असते,’ असं कॅप्शन या फोटोला दिलं गेलं आहे. हा फोटो दृष्टीस पडल्यानंतर त्या माउलीसाठी मनोमन हात जोडले गेले असले, तरी यातून हे वास्तव समोर येतं, की महिलांना कौतुकाच्या मखरात बसवून त्यांना कायमच कामाला जुंपलं जातं. त्यांना जुंपून घ्यावं लागतं, मग त्या स्वतः आजारी का असेनात! आई आजारी पडली, तरी ती काम करते, यात आपला समाज धन्यता मानतो. मात्र, तिला आजारपणात विश्रांती घ्यायला देत नाही, हा विरोधाभास यातून दिसतो. अनेक ट्विटर युझर्सनी हा फोटो पाहिल्यावर अशा आशयाच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गॅस शेगडी जवळ असताना ऑक्सिजन पाइप वगैरे यंत्रणा जवळ ठेवणं प्राणघातक असल्याकडेही यात दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे.
Wtf is this shit?
— Navin Noronha (@HouseOfNoronha) May 21, 2021
Let the woman rest jeez. pic.twitter.com/hnj2qRQyvp
अशा स्थितीत त्या महिलेला काम करायला लावणं हा क्रूरपणा आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. ज्या व्यक्तीने हा फोटो शेअर केला, त्या व्यक्तीला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याइतकी समज आहे, मग खरं तर त्या व्यक्तीकडे आईला किचनमध्ये मदत करण्याइतकी प्रगल्भता असायला हवी होती, असं काही जणांनी म्हटलं आहे.
Wtf is this shit?
— Navin Noronha (@HouseOfNoronha) May 21, 2021
Let the woman rest jeez. pic.twitter.com/hnj2qRQyvp
घरातली महिला एवढी गंभीर आजारी असताना कुटुंबातल्या व्यक्तींनी तिला मदत करायला हवी. फोटोत दिसतंय ते ‘आईचं प्रेम’ नव्हे, असं एका व्यक्तीने म्हटलंय. एकाने तर म्हटलंय, की या महिलेल्या घरचे सगळे गुन्हेगार आहेत. त्या सगळ्यांना तुरुंगात टाका. एकाने म्हटलंय, की त्या महिलेच्या कुटुंबातल्या व्यक्ती जर फोटो सोशल मीडियावर टाकू शकत असतील, तर त्यांना इंटरनेटवरून स्वयंपाक बनवणंही शिकता येईल. ‘महिलेचं दुःख, त्याग आदी गोष्टींना कौतुकाच्या मखरात बसवणं ही आपल्या देशात रूढ गोष्ट आहे. ‘ती कायमच कार्यमग्न असते’ ही आपल्या समाजात अभिमानाने सांगितली जाणारी गोष्ट आहे. मात्र वास्तव असं आहे, की तिला विश्रांती घेण्याची संधीच दिली जात नाही,’ अशी प्रतिक्रिया एका महिलेने यावर व्यक्त केली आहे.