जकार्ता, 06 जुलै : जगभरात अंत्यसंस्काराच्या अनेक पद्धती आहेत. कोणी गेलेल्या व्यक्तीला दफन करतं, तर कोणी मृतदेहाचं दहन करतं. प्राचीन इजिप्तमध्ये मृतदेहांना ‘ममी’च्या स्वरूपात सुरक्षितपणे दफन केलं जात होतं, जेणेकरून त्या मृतदेहाचं विघटन लवकर होऊ नये. या सगळ्यात एक गोष्ट सारखी आहे, ती म्हणजे माणूस एकदा गेला की तो परत येत नाही ही मान्यता. इंडोनेशिया देशातल्या एका जमातीमध्ये मात्र अत्यंत वेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. एवढंच काय, तर तिथले लोक दर वर्षी या मृतदेहांना शवपेटीमधून बाहेर काढून त्यांच्यासोबत उत्सव साजरा करतात. इंडोनेशियाच्या साउथ सुलावेसी भागात टोजारा जमातीचे लोक राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे दहा लाख एवढी आहे. या जमातीतले लोक कुटुंबातल्या कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला दफन करत नाहीत. तो मृतदेह कापडामध्ये गुंडाळून, शवपेटीत ठेऊन आपल्या घरातच ठेवतात. यानंतर एका विशिष्ट दिवशी हे मृतदेह शवपेट्यांमधून बाहेर काढून इथले लोक त्यांच्यासोबत उत्सव साजरा करतात. Weird Tradition : नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायकोकडून अश्लील डान्सचा तमाशा; अंत्यसंस्काराची विचित्र प्रथा या वेळी हे लोक आपल्या दिवंगत नातेवाईकांना नवे कपडे घालतात, त्यांच्यासमोर त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ ठेवतात, एवढंच नव्हे तर सिगारेट आणि अन्य गोष्टीही ते या मृतदेहांना देतात. कित्येक जण या वेळी आपल्या दिवंगत नातेवाईकांसोबत सेल्फीही घेतात. एकंदरीतच आपल्याकडे पितृपक्षात ज्याप्रमाणे आपण कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्तींचं स्मरण करतो, अगदी तसाच काहीसा हा प्रकार आहे; मात्र टोजारा लोक कावळ्यांना नव्हे, तर थेट एखाद्या व्यक्तीच्या मृतदेहालाच तिच्या आवडीचे पदार्थ देतात. टोजारा जमातीमध्ये असा समज आहे, की मृत्यूनंतरही आत्मा आपल्या शरीरातच राहतो. त्यामुळेच या मृतदेहांना कपडे, पाणी आणि आवडीचे पदार्थ दिले जातात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मृतदेहाला ‘टोंगकोनान’ असं नाव असणाऱ्या एका विशेष घरामध्ये ठेवलं जातं. त्यानंतर दर वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये हा मृत व्यक्तींचा उत्सव साजरा केला जातो. Weird Tradition : कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर कापतात महिलांची बोटं; कारणही धक्कादायक एक दिवस हा संपूर्ण उत्सव साजरा केल्यानंतर मृतदेहांना पुन्हा कापडामध्ये गुंडाळून शवपेट्यांमध्ये ठेवण्यात येतं. ही सर्व प्रक्रिया सुरू असताना टोजारा लोक टोजारा भाषेमध्ये प्रार्थना करत राहतात. तसंच, या वेळी ते गाणीही गातात. अशा प्रकारे हा मृतदेहांचा उत्सव साजरा केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.