ऐशोआरामी आयुष्य जगणाऱ्या श्वानांना बघून अनेक जण गमतीने म्हणतात, की आम्हालाही असं आयुष्य लाभलं असतं तर बरं झालं असतं. निव्वळ विनोद म्हणून असं अनेक जण म्हणतात; मात्र जपानमध्ये राहणाऱ्या तोको नावाच्या व्यक्तीनं ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यानं तब्बल 12 लाख रुपये खर्च करून स्वत:साठी एक अल्ट्रा-रिअॅलिस्टिक डॉग कॉस्च्युम तयार करून घेतला आहे. तो सतत हेच कपडे घालून बसतो. या कपड्यांमध्ये तो हुबेहुब श्वानासारखा दिसतो. त्याला पाहून कोणाचाही विश्वास बसत नाही, की तो कुत्रा नसून माणूस आहे. तोकोनं ट्विटरवर आपलं हे रूप दाखवून लोकांना थक्क केलं आहे. तोकोच्या म्हणण्यानुसार, त्याला लहानपणापासूनच प्राण्यांसारखं जीवन जगायचं होतं. त्याचं श्वानांवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आपणही श्वानांप्रमाणं जगावं, अशी त्याची इच्छा होती. त्याने आपला लूक बदलण्यासाठी झेपेट (Zeppet) या स्पेशल इफेक्ट्स वर्कशॉपशी संपर्क साधला आणि श्वानाचा एक अल्ट्रा रिअलिस्टिक पोशाख मिळवला. हा पोशाख घातल्याने तो एकदम श्वानासारखा दिसतो. यासाठी त्याला 12 हजार 480 पाउंड म्हणजेच भारतीय चलनात 12 लाख 48 हजार रुपये खर्च आला. 12 लाख खर्च करून स्वतः झाला श्वान - तोकोची ही विचित्र इच्छा पूर्ण करण्यासाठी झेपेटनं त्याच्याकडे मोठी रक्कम मागितली. कंपनीने त्याच्यासाठी कृत्रिम फर वापरून श्वानाचा पोशाख तयार केला. या दरम्यान, अगदी बारीकसारीक तपशीलांवर बारकाईनं काम केलं गेलं. 40 दिवसांनी हा पोशाख तयार झाला. यानंतर तोकोनं तो घातला आणि फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानं आपल्या नवीन आयुष्याचे अपडेट्स देण्यासाठी यू-ट्यूबवर एक चॅनेलही सुरू केलं आहे. जपानमध्ये सोशल मीडियापासून टीव्हीपर्यंत त्याच्या या विचित्र क्रेझची चर्चा आहे. त्याला आता एक वेगळीच चिंता सतावत आहे. हेही वाचा - Gautami Patil : एक कार्यक्रम रद्द, दुसरा टोटल हाऊसफुल्ल; पंढरपूरात गौतमीला पाहण्यासाठी तरुणांसह म्हाताऱ्यांचाही राडा कुटुंब आणि मित्रांना वाटतं विचित्र - यू-ट्यूब चॅनेलवर, तोको स्वतःला अगदी पाळीव श्वान असल्यासारखं दाखवतो. तो श्वानासारखाच झोपतो, उठतो आणि बसतो. अगदी तो नकली डॉग फूडदेखील खातो. आपली इच्छा पूर्ण होऊनही तोकोला आता एका गोष्टीची काळजी वाटत आहे. त्याच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना त्याचं वागणं विचित्र वाटत आहे. ‘मिरर’शी बोलताना तोको म्हणाला, की ‘मी प्राणी का झालो याचं त्यांना आश्चर्य वाटतं आहे. मी त्यांना खूप विचित्र वाटतो.’ तोकोला फॉलो करणाऱ्यांनी त्याचं सांत्वन केलं आहे. त्यानं आपली इच्छा लपवू नये, कारण त्यात काहीही वाईट नाही, असं त्याच्या फॉलोअर्सचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.