मुंबई, 29 फेब्रुवारी : साप म्हटलं की लोकांची घाबरगुंडी उडते. साप-मुंगुसाची लढाई, सापाने अनेक प्राणी लढाई जिंकून गिळल्याचे व्हिडिओ अंगावर काटा आणतात. मध्यंतरी सापानं प्लास्टिकची बाटली गिळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सापाचा आणखी एक असाच भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या सापानं आता प्राणी नाही तर चक्क लांब टॉवेल गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांना मोठ्या अथक प्रयत्नांनी या सापाने गिळलेला टॉवेल बाहेर काढण्यात यश आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एरवी एका फटक्यात उंदराला गिळणाऱ्या सापानं टॉवेल कसा गिळला हा सवाल उपस्थित केला जात आहे. या व्हिडिओला फेसबुकवर 7 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यावर हा साप आला होता. त्याची अवस्था बिकट असल्याचं तिथल्या नागरिकांच्या लक्षात आलं. त्यांनी या सापाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या सापाचं वय 18 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या या सापावर उपचार सुरू आहे.