मुंबई 26 नोव्हेंबर : एखाद्या पर्यटनस्थळी माकडांना काहीतरी खायला दिलं जातं अन् माकडं पर्यटकांच्या हातातील खाद्यपदार्थ हिसकावून पळ काढतात असे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून नेटिझन्सचं मनोरंजनही होतं. असाच एक व्हिडिओ सध्या खूप पाहिला जात आहे. साप दिसल्यानंतर एक महिला त्याच्या दिशेनं चप्पल भिरकावते. पण चिडलेला साप ती चप्पल घेऊन झुडूपामध्ये गायब होतो. व्हायरल व्हिडिओतील या सापाला पाहून अनेकजण चकित होत आहेत. सापाला पाहिलं की भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. एक साप आपल्या दिशेनं येत असल्याचं पाहिल्यानंतर महिला प्रचंड घाबरते. काय करावं हेच तिला कळत नाही. साप चावा घेईल या असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती पायातून एक चप्पल काढून ती सापाकडे भिरकावते. साप ती चप्पल तोंडात धरून वेगात सरपटत जातो. सरपटताना साप फणा काढतो व तोंडात चप्पल पाहून त्या मार्गावरून ये-जा करणारे लोक चकित होतात, असं या व्हिडिओत दिसतं. तसं पाहायला गेलं तर आजही ग्रामीण भागात मुलगा किंवा मुलगी आईचं म्हणण ऐकत नसतील तर आई चप्पल असो वा हातातलं लाटणं, उलतनं ती आपल्या मुलाच्या दिशेनं भिरकावून राग व्यक्त करते. पण घाबरलेल्या महिलेनं सापाला हुसकावून लावण्यासाठी भिरकावलेली चप्पलच सापानं नेल्यानं तो साप खूपच स्मार्ट असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. आयएफएस ऑफिसरनं ट्विट केला व्हिडिओ साप चप्पल घेऊन जात असतानाचा व्हिडिओ एका आयएफएस ऑफिसरनं ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ नेमका कधी काढला व कुठला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
त्या चप्पलचं साप करणार तरी काय? आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना एक प्रश्न उपस्थित केला. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ‘साप चप्पल तर नेत आहे. पण त्याला पायच नाहीत मग तो या चप्पलचं करणार काय? हा व्हिडिओ 34 हजारांवर लोकांनी पाहिला आहे. तर 1700 लोकांनी पसंती दर्शवली आहे. यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका व्यक्तीनं मजेशीर कमेंट करताना तो साप बिहारचा असून, इथं नेता आणि साप आल्यानंतर कधीच रिकाम्या हातांनी जात नसल्याचं म्हटलं आहे. त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती म्हणाली की, चप्पल व बूट चोरी करण्याची इथं कदाचित प्रथा असावी. साप चप्पल नेत असताना महिला ओरडताना व हसताना व्हिडिओत ऐकू येत आहे. हे दृश्य खरोखरच दुर्मिळ असून खूप कमी वेळा असा प्रसंग पाहायला मिळत असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत.