मुंबई 13 डिसेंबर : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साइटवर अकाउंट आहे. त्यावर अनेक जण आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करतात. काही जणांना तर इतकी आवड असते, की दिवसभरात आपण काय-काय केलं याचेदेखील अपडेट ते सोशल मीडियावर देतात. अशा सवयींमुळे अनेकदा सोशल मीडिया साइट्सवर अनोखे व्हिडिओज पहायला मिळतात. काही व्हिडिओ गमतीशीर असतात, तर काही व्हिडिओ आश्चर्य व्यक्त करायला लावणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक महिला एका मुलाला खांद्यावर ठेवून शिडीच्या मदतीने डोंगराचा कडा चढत आहे. तिच्याशिवाय इतरही काही जण संतुलन साधत चढताना दिसत आहेत. एका फेसबुक पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘हे अरुणाचल प्रदेशमधलं एक छोटंसं गाव आहे. या गावात बस, ट्रेन यासारख्या प्रवासाच्या साधनांची सुविधा नाही. तिथल्या नागरिकांना रोजचं जीवन जगताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.’ या पोस्टसोबत तीन मिनिटं सात सेकंदांचा एक व्हिडिओदेखील शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये खांद्यावर मुलाला घेतलेल्या महिलेसह अनेक जण जीव धोक्यात घालून शिडीच्या साह्याने खडकाळ भागातून मार्ग काढताना दिसत आहेत.
ही दृश्यं भारताच्या ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या एका गावातली असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. नंतर या व्हिडिओची तपासणी केली असता, हा व्हिडिओ भारताशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडिओ चीनमधल्या एका गावाचा आहे. 27 मे 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या सीएनएनच्या एका बातमीमध्ये या गावाचा उल्लेख आढळलेला आहे. या वृत्तानुसार, चीनच्या सिचुआन प्रांतात अतुलेअर (Atule’er) नावाचं गाव आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ याच गावातला आहे. बातमी प्रकाशित झाली त्या वेळी तिथली लोकसंख्या 400च्या आसपास होती. चेन जी नावाच्या छायाचित्रकाराने गावापर्यंत पोहोचण्याचा खडतर प्रवास अनुभवला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ‘तिथे चढून जाणं खूप धोकादायक होतं. उतरताना काय वाटत असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.’ या गावात पोहोचण्याचा रस्ता इतका धोकादायक आहे, की मुलांना शाळेत जाण्यासाठी 800 मीटर उंच खडकावरून खाली उतरावं लागतं. हा धोकादायक प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना दोन तास लागतात. ही मुलं महिन्यातून फक्त दोनदा घरी जातात. अनेक मुलं त्यांच्या पालकांसोबत हा प्रवास करतात. हे गाव भारतातलं नसलं, तरी तिथल्या परिस्थितीचा व्हिडिओ बघून अनेकांच्या अंगावर भीतीनं शहारे उभे राहिले आहेत.

)







