नवी दिल्ली, 13 डिसेंबर: मांजरानं एका कबुतराची शिकार करण्याऐवजी चक्क त्याचं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. वास्तविक मांजर आणि कबुतर यांचं नातं अन्नसाखळीनुसार वेगळं असतं. कबुतर हे मांजराचं खाद्य आणि त्यामुळेच शिकार असते. कबुतर दिसल्यानंतर त्याच्यावर दबा धरून झडप घालणं आणि त्याचा फडशा पाडणं, हे खरं तर मांजरांचं काम. मात्र जेव्हा याच्या उलट घडतं, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं.
मांजर गेलं कबुतराकडे या व्हिडिओत एका घराच्या गच्चीवर मांजर आणि कबुतर बसल्याचं दिसतं. मांजर दबा धरून हळू हळू कबुतराच्या दिशेनं सरकत जातं. आता हे मांजर कबुतरावर झडप घालणार आणि त्याची शिकार करणार, असंच सुरुवातीला वाटतं. विशेष म्हणजे कबुतरदेखील मांजराकडे पाहताना दिसतं. साधारणपणे जेव्हा कबुतराला मांजर आपल्या इतक्या जवळ आल्याचं समजतं, तेव्हा ते तिथून झटक्यात उडून जातं. मात्र या व्हिडिओतील कबुतरदेखील अनोखं आहे. आपल्याकडे मांजर येत असल्याचं दिसत असूनही कबुतर आपल्याच जागेवर बसून राहतं आणि मांजराकडे पाहत राहतं. मांजराने केलं KISS मांजर हळूहळू कबुतरापाशी आलं. त्याच्या चेहऱ्यावर गेलं आणि आपल्या तोंडाने त्याचा चोचीला स्पर्श केला. त्यानंतर पुढे काय घडणार, याबाबत कमालीची उत्सुकता ताणली गेल्यानंतर मांजर एका झटक्यात तिथून माघारी वळतं आणि निघून जातं. हे वाचा- सोशल मीडिया स्टारची आत्महत्या; ट्रोलिंगमुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल सर्वांनाच वाटलं आश्चर्य केवळ 13 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण खूश होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ पाहून आनंद झाल्याचं ते सांगत आहेत. मांजर आणि कुठलाही पक्षी यांचं नातं हे विळ्याभोपळ्याचं असतं. कुठलाही पक्षी मांजर जवळ येत असल्याचं पाहून उडून जातो, मात्र हा अनोखा व्हिडिओ पाहून युजर्सनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला आहे.