मुंबई, 03 ऑगस्ट : कोरोनाच्या महामारीमुळे देशासह राज्यांची आर्थिक चाकं खिळखिळी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे उद्योग व्यवसाय, दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. राज्याची लाइफलाइन असलेल्या लालपरी अर्थात एसटीचे चाकं या लॉकडाउनमुळे रुतली आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे. अशाच एका कर्मचाऱ्याचा मन हेलावून टाकणारा फोटो समोर आला आहे.
लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट पडला आहे. पगार देण्यासाठीही पैसे नसल्यामुळे कर्मचारी हवालदील झाले आहे. त्यातच वेंगुर्ला बस स्थानकावर एका कंडक्टरचा फोटो काळीज धस्स करणार आहे. आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा हा फोटो आहे.
ज्या एसटी बसने आपल्याला चार पैसे दिले, संसार सांभाळला, तिचा निरोप घेताना या कर्मचाऱ्याचे डोळे पाणावले. बससमोर गुडघ्यावर बसून या कर्मचाऱ्याने ढसाढसा रडत या लालपरीचा निरोप घेतला. मन हेलावून टाकणारा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वेंगुर्ला बस स्थानकावर कंडक्टर म्हणून काम करणारे सी.बी. जाधव यांचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच सी.बी. जाधव यांनी सेवानिवृत्त झाले होते. गेली अनेक वर्ष या स्थानकात काम करत असताना आज असं अचानक स्थानकातून बाहेर पडत असताना जाधव यांचे डोळे भरून आले. लालपरीसमोर ते गुडघ्यावर बसले आणि हात जोडून 'आता मी तुझा निरोप घेतो' असं म्हणून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
चंद्रशेखर जाधव हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे वडीलही परिवहन महामंडळात कामाला होते. सावंतवाडीमध्ये ते काम करत होते. त्यानंतर जाधव कुटुंबीय सावंतवाडीत स्थायिक झाले. वडिलांच्या निवृत्तीनंतर त्यांचा वारसा जपत जाधवही महामंडळात कामाला लागले. तब्बल 38 वर्ष त्यांनी कंडक्टर म्हणून काम केलं.
लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला प्रचंड मोठा आर्थिक तोटा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देणेही कठीण झाले आहे. शेवटी एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. अनेक कर्मचारी हे निवृत्तीचा मार्ग पत्कारून बाहेर पडत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला हातभार लावावा, अशी मागणी सरकारकडे होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.