वाराणसी, 10 जुलै : गेल्या महिन्यात मोठी आवक झाल्याने टोमॅटोला कवडीमोल दर मिळत होता. परिणामी शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु आता मात्र आवक घटल्याने टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय. केवळ टोमॅटोसाठी अख्खी शंभराची नोट आणि वरचे पैसे द्यावे लागताहेत, त्यामुळे गोड, लालचुटुक टोमॅटो कांदा होऊन ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतोय. आता तर चक्क दुकानदारांनी टोमॅटोच्या संरक्षणासाठी बाउन्सर ठेवल्याची घटना समोर आली आहे. हे दुकानदार म्हणजे कोणी साधेसुधे नाहीत, तर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी स्वतः यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते अजय फौजी हे भाजीविक्रेते असून वाराणसीच्या लंका भागात त्यांचं दुकान आहे. खास टोमॅटोच्या संरक्षणासाठी या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी साध्या कपड्यांतील बाऊन्सर तैनात केले होते. मात्र वाढलेल्या दरांवरून ग्राहकांनी बाचाबाची करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी गणवेशधारी बाऊन्सर तैनात केले. याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून अखिलेश यादव यांनी ‘भाजपाने टोमॅटोला ‘Z+’ सुरक्षा द्यावी’, असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.
भाजपा टमाटर को ‘Z PLUS’ सुरक्षा दे. pic.twitter.com/k1oGc3T5LN
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 9, 2023
याबाबत बोलताना अजय फौजी म्हणाले, जेमतेम 30 रुपये किलोने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर शंभरच्या पुढे गेले हे ग्राहकांना पटतच नाहीत. त्यांच्यात आणि दुकानदारांमध्ये यावरून भांडण होतं. काहीजण तर भांडण करून खरेदी न करताच माघारी फिरतात. ही रोजरोजची भांडणं नकोशी झाली होती. म्हणून मी शेवटी हा निर्णय घेतला आणि दुकानावर बाऊन्सर तैनात केले. आता 140-160 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री होतेय. त्यावरून कोणतंही भांडण होऊ नये, यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत माझ्या दुकानात बाउन्सर तैनात असतात, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर बाऊन्सरना पाहून ग्राहक दुकानात येतात का, असं विचारलं असता ते म्हणाले, ‘ग्राहक येतात, किंमत विचारतात. पटलं तर, बाऊन्सर्सकडे पैसे देतात आणि भाजी घेऊन जातात.’
विशेष म्हणजे भाजीच्या दुकानात पहारेदार असण्याची ही पहिलीच वेळ असल्याने काहीजण या बाऊन्सरकडे आश्चर्यचकीत होऊन पाहत राहतात. दरम्यान, 1 जुलै रोजी अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अजय फौजी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी टोमॅटोच्या आकाराचा केक कापून या दरवाढीचा निषेध नोंदवला होता. तसेच लोकांमध्ये टोमॅटोवाटप केलं होतं.