वाराणसी, 27 मे : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने पुन्हा एकदा नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अनेक लोक या गुलाबी नोटा घेऊन पेट्रोल पंप, मार्केट आणि रेशन दुकानांवरही खरेदी करताना दिसत आहेत. परंतु ही 2 हजारची नोट वापरताना अनेक समस्या देखील निर्माण होतात. परंतु ही समस्या टाळण्यासाठी वाराणसीतील एका दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. वाराणसी शहरातील सिगरा भागातील टॅटू शॉपमध्ये दुकानदाराने 2000 च्या नोटेवर ग्राहकांना खास ऑफर दिली आहे. हा दुकानदार ग्राहकांना 2 हजार किंमतीचे टॅटू काढण्याचा किंवा ग्राहकांना त्याच्या दुकानातील इतर वस्तू खरेदी करण्यासाठी 50 टक्के सूट देत आहे. या स्पेशल ऑफर बद्दल दुकानदाराने ठिकठिकाणी पोस्टरही लावले असून त्यात 2000 च्या नोटे विषयी लिहिले आहे.
वाराणसी दुकानदाराच्या या अनोख्या युक्तीमुळे ग्राहकांना देखील याचा फायदा होत असून दुकानदाराच्या नफ्यामध्ये देखील वाढ झाली आहे. दुकानदार अशोक गोगिया यांनी सांगितले की, जेव्हा पासून आरबीआयने २ हजाराच्या नोटा बंद केल्या आहेत त्यादिवसापासून ग्राहक लहान सहन वस्तूंची खरेदी केल्यानंतरही 2 हजारांची नोट देत आहेत, अशावेळी सुट्टे पैसे देताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र या युक्तीनंतर आता त्याची अडचण संपली आहे. तर समस्या नुसतीच संपली नसून या अनोख्या युक्तीमुळे त्यांच्या व्यवसायही वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांसह दुकानदारही खूश आहेत.