Home /News /viral /

यंदा चलो नेपाळ! या साठीतल्या तीन आज्या रोड ट्रीपमधून पालथं घालत आहेत जग...

यंदा चलो नेपाळ! या साठीतल्या तीन आज्या रोड ट्रीपमधून पालथं घालत आहेत जग...

म्हातारपणात अनेक लोक देवधर्माकडं वळतात. इथं या आज्यांनी मात्र एक भन्नाट उदाहरण आपल्या अनुभवातून घालून दिलं आहे.

    मुंबई, 17 जानेवारी : वयाचे आकडे (age) आपलं आयुष्य ठरवत असतात असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. या तीन आज्यांनी मात्र तारुण्यातला जोश आणि कुतूहल दाखवत भन्नाट रोड ट्रिप्सच्या वाऱ्या सुरू ठेवल्या आहेत. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'च्या (humans of Bombay) सोशल मीडिया पेजवर (social media page) प्रसिद्ध झालेल्या या जगावेगळ्या तिघींच्या स्टोरीला लोक भरभरून दाद देत आहेत. अनेकांना या स्टोरीतून केवळ फिरण्याची नाही तर जगण्याचीही प्रेरणा (inspiration) मिळते आहे. यातल्या दोघी आहेत मोनिका आणि प्रतिभा. ही गोष्ट शेअर करणाऱ्या आजीचं नाव मात्र कळू शकलं नाही. या पेजसाठी आपली गोष्ट सांगतांना या आजी म्हणतात, 'मला गाडी चालवायला नेहमीच आवडते. विशेषत: रोड ट्रिप (road trip). जेव्हा केव्हा आम्ही कुटुंबीय उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी प्रवास करायचो तेव्हा स्वतःहून स्टीयरिंग व्हील ताब्यात घ्यायचे. घेईन. एकदम हलकं, मोकळं वाटायचं. एकदा असंच मी आणि माझा मुलगा रोड ट्रिपवरुन परतत असताना मनात विचार चमकला, ‘मी जर संपूर्ण भारतभर गाडी घेऊन फिरू शकले तर किती खास होईल!’ पुढं त्या सांगतात, 'मी लगोलग काही मैत्रिणींना कॉल केला आणि माझ्या कल्पनेविषयी सांगितलं. काही जणी घाबरल्या. काहींच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या. काही जणी तर माझ्यावर हसल्या. कारण मी पडले 2 मुलांची आई आणि एका मुलाची आजी! पण मी मात्र मनापासून हे ठरवलं होतं. मी माझी शेजारी असलेली मैत्रीण मोनिकाला फोन केला तेव्हा ती एकदम उत्साहानं 'हो' म्हणाली. माझी बहीणही एका पायावर तयार झाली. आम्ही तब्बल महिनाभर नकाशांचा अभ्यास केला. आणि टायर कसं बदलायचं हे शिकल्यानंतर आम्ही तीन आज्या रस्त्यावर उतरलो!' या तिघींच्या प्रवासाची सुरुवातच झाली, ती टायर पंक्चर होऊन. यातून बाहेर पडल्या तसं पुढं काही अंतरावरच ब्रेक फेल झाले. पण या धडाडीच्या बायका काही इतक्यानं खचून जाणार नव्हत्याच. प्रवास सुरू राहिला. तिघी मिळून दिवसात 300 किमी गाडी चालवायच्या. केवळ लघुशंकेसाठी तेवढं ब्रेक घ्यायच्या. 29 दिवस आणि 4400 कि.मी. अंतर कापल्यावर त्या पोचल्या डेस्टिनेशनवर. यात साहजिकच त्यांना मोठाच गड सर केल्यासारखं वाटत होतं. आता त्या इतक्या  एक्साइट झाल्या, की ठरवलं, हे  दरवर्षी रिपीट करायचं. दुसर्‍या वर्षी, या आजींच्या बहिणीला काही येणं जमवता आलं नाही. मग त्यांची कॉलेजमैत्रीण प्रतिभा जॉईन झाली. पुन्हा एकदा या नॅनीज रस्त्यावर उतरल्या होत्या! यावेळी त्यांनी राजस्थानच्या गल्ल्या पालथ्या घातल्या. तिथं एकदा त्यांना 600 पायऱ्या चढाव्या लागल्या. धावपळ खूप झाली. चढताना एकमेकांची चेष्टा करणं मात्र त्यांनी थांबवलं नाही! आजी सांगतात, 'मी मस्त गमतीदार स्वभावाची आहे, मोनिका अष्टपैलू आहे आणि प्रतिभा तार्किकतेत हुशार आहे. हे एक उत्तम रसायन आहे. आम्ही जिथे जिथे जाऊ तिथे आपल्याबरोबर एक लहान स्वयंपाकघर ठेवतो. पुढं आम्ही आणखी दोनदा प्रवास केला - एकदा बंगालच्या घाटांवर आणि नंतर आम्ही भूतानसुद्धा (Bhutan) गाठलं. तिथं गाडी चालवणाऱ्या आम्हीच महिला होतो. साठाव्या वर्षी आम्ही रिव्हर राफ्टिंग केले, घूमर  नाचलो, आमची बॅग हिसकावणाऱ्या माकडाचा पाठलाग केला... सगळीच धमाल!' 'गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही. यंदा मात्र आम्हाला नेपाळला (Nepal) निघायचं आहे. आता राहवत नाही, पुन्हा एकदा ड्रायव्हरच्या सीटवर बसत जिंदगी एक सफ़र है सुहाना ऐकायचं आहे, अचानक फेल झालेले गाडीचे टायर बदलायचे आहेत...' या सुंदर ओळीनं त्यांनी केलेला शेवट अनेकांची मनं जिंकतो आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nepal, Woman Driver

    पुढील बातम्या