नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : आजपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला आहे. व्हॅलेंटाइन डेपर्यंतचा हा आठवडा प्रेमी युगलांसाठी खूप खास असतो. या आठवड्यात लोक आपलं प्रेम व्यक्त करतात. या आठवड्यात सर्वांत जास्त डिमांड असते ती गुलाबाच्या फुलाची. रोझ डेपासून ते व्हॅलेंटाइन डेपर्यंत गुलाबाचं फूल या सेलिब्रेशनचा महत्त्वाचा भाग असतं. या काळात फुलांच्या किमतीही वाढतात. जगभरात अनेक प्रकारचे गुलाब आढळतात; पण एक फूल असं आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपये असते. या फुलांच्या किमतीत तुम्ही अनेक आलिशान बंगले व गाड्या घेऊ शकता. या फुलाविषयी सविस्तर जाणून घेऊ या. याबद्दल नवभारत टाइम्सने वृत्त दिलंय.
ज्युलिएट रोझ
जगातल्या सर्वांत महाग गुलाबाचं नाव ज्युलिएट रोझ आहे. तुम्ही 50, 100, 1000 किंवा 2000 रुपयांचे गुलाब घेतले असतील; पण या फुलाची किंमत इतकी जास्त आहे की ते घेणं प्रत्येकाला जमत नाही. या फुलाची शेती करणंही खूप अवघड आहे. त्याची किंमत 112 कोटी रुपये आहे.
2006मध्ये पहिली झलक -
गुलाबाचा हा प्रकार विकसित करायला तब्बल 5 मिलियन डॉलर खर्च आला होता. 2006 साली हा गुलाब जगासमोर आला होता, तेव्हा त्याची किंमत 90 कोटी रुपये होती. कालांतराने त्याच्या किमती कमी झाल्या; पण आजही ते 30 मिलियन रोज म्हणून ओळखलं जातं.
फुलायला लागली 15 वर्षं
ऑस्टिन यांनी पहिल्यांदा ज्युलिएट गुलाबाची शेती सुरू केली होती. ऑस्टिनने वेगळ्या पद्धतीने त्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला होता. विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ ज्युलिएट या नाटकातून प्रेरित होऊन त्यांनी गुलाबाच्या विविध जातींचं मिश्रण करून एक नवीन प्रकारचं फूल तयार केलं आणि त्याचं नाव ज्युलिएट रोझ ठेवलं होतं, असं म्हटलं जातं. हे फूल फुलायला 15 वर्षं लागली होती, असं म्हटलं जातं.
सुगंध आहे खास
डेव्हिड ऑस्टिनने आपल्या ऑफिशियल अकाउंटवर या फुलाच्या सुगंधाबद्दल भाष्य केलंय. ज्युलिएट रोझचा सुगंध हलका आणि परफ्युमसारखा वाटतो. त्याच्या सुगंधामुळेच ते इतर फुलांपेक्षा वेगळं ठरतं.
इतर महागडी फुलं
कुडुपल फ्लॉवर -
हे फूल वर्षातून एकदा आणि फक्त रात्री फुलतं. याला भुताटकी फूल म्हटलं जातं. ते फक्त श्रीलंकेत आढळतं.
रॉट चाइल्ड स्लीपर ऑर्किड -
हे फूल फुलायला अनेक वर्षं लागतात. त्याची किंमत लाखात असून मलेशियातल्या किनाबालु नॅशनल पार्कमध्ये हे फूल 1987मध्ये दिसलं होतं. हे फूल फक्त याच ठिकाणी फुलतं आणि त्याला गोल्ड ऑफ किनाबालु ऑर्किड म्हटलं जातं.
शेन्झेन नोंगके ऑर्किड -
शेन्झेन नोंगके ऑर्किड हे आतापर्यंत विकलं गेलेलं सर्वांत महाग फूल आहे. 2005मध्ये लिलावात ते 290,000 डॉलर्सना विकत घेतलं होतं. शेन्झेन नोन्गके विद्यापीठातील चिनी कृषी शास्त्रज्ञांनी ते विकसित केलं होतं. आठ वर्षं शास्त्रज्ञांनी त्यासाठी मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे हे गुलाबाचं फूल चार-पाच वर्षांत एकदाच फुलतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love, Rose, Valentine day plans, Valentine week, Viral