बंगळुरू 06 जुलै : सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर नफेखोरांनी त्याचा काळाबाजारही सुरू केला आहे. टोमॅटोचे भाव चढे असल्याने ग्राहकांनीही खरेदी कमी केली आहे. सध्या बाजारात टोमॅटोचा भाव 100 ते 120 रुपये किलोवर पोहोचला आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या भाज्यांची चवही बिघडली आहे. या दरम्यान आता चक्क शेतातून टोमॅटोची चोरी झाल्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच असंच एक प्रकरण आता कर्नाटकच्या हासन जिल्ह्यातून समोर आलं आहे. यात एका शेतकऱ्याच्या शेतातून काही चोरांनी चक्क टोमॅटो पिकाची चोरी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृतानुसार, एका महिला शेतकऱ्याने आरोप केला आहे की, कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील हलेबिडू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तिच्या शेतातून 4 जुलैच्या रात्री 2.5 लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. Jalna News : 20 रुपये किलो असलेला टोमॅटो अचानक महागला कसा? Ground Report महिलेने आरोप केला आहे की, त्यांनी 2 एकर शेतजमिनीवर टोमॅटोचं पीक घेतलं आहे. आता टोमॅटोचं पीकही काढणीला आलं होतं. भावही चांगले होते. हे पीक बाजारात नेण्याचं नियोजन केलं होतं. मात्र त्याआधीच ते चोरी झालं. महिला शेतकऱ्याने सांगितलं की, बेंगळुरूमध्ये टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. अशा स्थितीत पीक काढून बाजारात विकावं, अशी योजना त्यांनी आखली होती. महिलेनं सांगितलं, की टोमॅटोचं पीक पिकवण्यासाठी त्यांनी मोठं कष्ट घेतलं होतं. सोबतच टोमॅटो पिकवण्यासाठी त्यांना कर्जही घ्यावं लागलं होतं. यावेळी त्यांचं टोमॅटोचं पीक चांगलं आलं होतं. सोबतच बाजारात टोमॅटोचे भाव जास्त असल्याने त्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र चोरांनी त्याचा नाश करून संपूर्ण पीक चोरून नेलं. महिलेनं सांगितलं, की चोरट्यांनी सुमारे 50-60 पोती टोमॅटो चोरून नेलं आणि उरलेलं पीक नष्ट केलं. याप्रकरणी हलेबिडु पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.