हातात खडू पकडायला बोटं नाही, पण प्रतिभा खचल्या नाही; जगण्याला बळ देणारा VIDEO

हातात खडू पकडायला बोटं नाही, पण प्रतिभा खचल्या नाही; जगण्याला बळ देणारा VIDEO

इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या साधारणपणे 25 विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्याना शिकवितात.

  • Share this:

पालघर, 05 ऑक्टोबर : असे एकही क्षेत्र नाही की ज्यात महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. अशीच एक प्रेरणादायी कहाणी पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे येथील शरीराने अपंग असलेल्या कर्तृत्ववान शिक्षिका प्रतिभा हिलीम या शिक्षिकेची आहे.

प्रतिभा हिलीम या शिक्षिका म्हणून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पंचायत समिती अंतर्गत राहनाळ येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असताना 2019 साली तापासारख्या आजाराने त्या आजारी पडल्या. हा आजार एवढा बळावला गेला की आजारात त्यांना आपले दोन्ही हात पाय अर्ध्यातून गमवावे लागले. मात्र, एवढे मोठे संकट आले तरीही त्या खचल्या नाहीत. त्यांचे मूळ गाव विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे असल्यामुळे आपण गावाच्या ॠणात आहोत, याची जाणीव ठेवून त्या आपल्या गावी आल्या.

त्यानंतर कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद झाल्या. शाळा सुरू करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हेही सांगता येणे कठीण झाले. शाळा सुरू झाल्याच तरी, सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण झाले. सरकारने शाळा ‘ऑनलाइन’ सुरू करायला परवानगी दिली.

अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे, ऑनलाइन उपक्रम सुरू देखील केले. परंतू, ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, पालकांकडे अँड्राइड मोबाइल नसणे, यामुळे अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत, ही बाब प्रतिभा हिलीम यांच्या लक्षात आली.

या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून येथील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांनी ज्ञानदानाच्या कार्याला सुरूवात केली. आपल्या अपंगावर यशस्वीपणे मात करत जे विद्यार्थी आज ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य त्या करीत आहेत.

इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या साधारणपणे 25 विद्यार्थ्यांना त्या शिकविण्याचे काम करतात. आपल्या हाताच्या बेल्टला पेनाचे टोपण लावून त्यात खडू वापरून त्या विद्यार्थ्याना शिकवितात. त्यांचे हे कार्य असेच सुरू आहे.

सांगा कसं जगायचं? कण्हत-कण्हत की गाणं म्हणत? कवीवर्य मंगेश पाडगावकरांची कविता आठवली की, जगण्याला उमेद देणाऱ्या भावना उचंबळून येतात. आयुष्यात सर्व काही मिळूनही कण्हत कण्हत जगणारी माणसं या जगात आहेत. मात्र, आपल्या आयुष्यात शारीरिक कमतरता असतानाही आनंदी जीवन जगणारी माणसेही आहेत. एका जिद्दी, हुशार, कष्टाळू व समर्पण भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या शिक्षिकेची ही कहाणी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

Published by: sachin Salve
First published: October 5, 2020, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या