नवी दिल्ली, 30 जून : एका माशाने पश्चिम बंगालमधील एका मच्छिमाराचे नशीबच पालटले आहे. हा दुर्मिळ प्रकारचा मासा मच्छीमार रहीमुल याने पकडला आणि तो एका झटक्यात करोडपती झाला. त्याच्या सोबत नेमकं काय घडलं हे जाणून घेऊयात. या माशाची लांबी 3 फूट, रुंदी एक तर वजन 28 किलो आहे. हा तेलिया भोला माशाची तब्बल पाच लाख रुपयांना विक्री झाली आहे. त्याच्या खरेदीसाठी खरेदीदारांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून आली. पश्चिम बंगालमधील दिघा मोहना मासळी बाजारात यावेळी हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दिघा मोहना हे फीश मार्केट आहे. याठिकाणी मासे पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. दिघ्याच्या घेरसाई भागात राहणारे शेख रहीमुल सांगतात की, यावेळी पहिल्यांदाच एवढा मोठा तेलिया भोला दिघ्यात विकला गेला आहे. हा मासा त्याच्या वडिलांच्या मासेमारी बोटीच्या जाळ्यात अडकला होता. यानंतर रहिमूलने त्याला त्याच्या वडिलांसोबत लिलावात आणले. या माशाबाबत लिलावात बराच गदारोळ झाला होता. अखेर, घाऊक व्यापारी प्रेमानंद बर्मन यांनी 18,000 रुपये प्रति किलो दराने हा मासा विकत घेतला. परिवार आनंदी - cnbcTV18 हिंदीच्या एका अहवालानुसार, या हंगामात रहिमुलच्या परिवारातील जवळपास 17 बोटी मासे पकडण्यासाठी समुद्रात फिरत आहेत. मात्र, अजून पर्यंत एकही मासा हाती नाही आला होता. हा तेलिया भोला मासा त्यांच्या पाच नंबरच्या बोटीत अडकला. आता या माशाच्या लिलावानंतर रहिमुलचा परिवार फार आनंदी आहे. हा मासा इतका महाग का - तेलिया भोला मासा हा इतका महाग का असतो, हे जाणून घेऊयात. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे पोट. याच्या पोटातील चरबी (फॅट) क्रॅकर खूप फायदेशीर आहे. या माशाचे सर्वात मोठे खरेदीदार औषध कंपन्या आहेत. या माशांच्या पोटातील चरबीपासून अनेक जीवरक्षक औषधे बनवली जातात. त्याला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यामुळेच या माशाची किंमत इतकी वाढली आहे, असे हा मासा खरेदी करणाऱ्या प्रेमानंद यांनी म्हटले. ते म्हणाले की, औषधी गुणधर्मांनी भरलेले हे फिश क्रॅकर आंतरराष्ट्रीय बाजारात 10 लाख रुपये प्रति किलो या दराने विकले जातील. तर दरवर्षी असे एक-दोन मासे पकडले जातात. या मोसमात प्रथमच असा मासा आला आहे, असे दिघा मच्छीमार आणि मासे व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नवकुमार पाय यांनी सांगितले.