मुंबई, 13 डिसेंबर: दसरा-दिवाळी झाली, की भारतात लग्नाचा सीझन सुरू होतो. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडतात. लग्न म्हटलं, की घरातली वडीलधारी माणसं मान-पानाची तयारी करण्यात व्यग्र असतात. लग्नसोहळ्यांमध्ये सर्वच नातेवाईकांचा मान राखून आनंदी ठेवणं सोपं नसतं. अनेकदा नातेवाईक नाराजही होतात. नाराज नातेवाईक मग लग्नसोहळ्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. कधी नवरदेवाच्या मिरवणुकीत दारू पिऊन धिंगाणा घातला जातो, तर कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरून एकमेकांशी भांडण केलं जातं. अशाच भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये, एकीकडे वधू वरमाला विधीदरम्यान वराची आरती करताना दिसत आहे, तर दुसरीकडे खाली उभे असलेले पाहुणे एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. rajuraj2794 नावाच्या अकाउंटवरून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 79 हजारांहून व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये वरमाला विधीसाठी वधू-वर स्टेजवर उभे असल्याचं दिसत आहे. स्टेज फिरत असून नववधू हातात आरतीचं ताट घेऊन उभी असलेली दिसत आहे. खाली उभे असलेले सर्व जण वधू-वरांना पाहत आहेत. दरम्यान, खाली उभ्या असलेल्यांमध्ये अचानक बाचाबाची सुरू होते. ड्रोन कॅमेरा हे सर्व दृश्य रेकॉर्ड करतो. हेही वाचा- Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच; काय आहेत फीचर्स अन् किंमत? या व्हिडिओमध्ये, उपस्थित पाहुणे आधी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना दिसत आहेत. त्यानंतर काही जण एकमेकांवर खुर्च्या फेकायला लागतात. ही भांडणं बघून नवरदेव खाली उतरण्याच्या तयारीत असतो; मात्र स्टेजजवळ उभी असलेली एका मुलगी त्याला खाली जाण्यापासून थांबवते. व्हिडिओ पाहून युझर्स विविध विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींना हा व्हिडिओ बघून हसू आवरेनासं झालं आहे. त्यांनी खळखळून हासण्याच्या इमोजी कमेंट सेक्शनमध्ये पोस्ट केल्या आहेत.
लग्न सोहळ्यांमधल्या अशा चित्र-विचित्र घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वराने सर्वांसमोर चुंबन घेतल्यानं एका वधूनं लग्न मोडल्याच्या घटनेची बातमी काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाली होती. आपल्या लग्नसोहळ्यात दिल्लीतलं एक जोडपं गाणी गात असल्याचा व्हिडिओही चांगलाच गाजला होता.