मुंबई 1 डिसेंबर : आपल्याला जंगली प्राण्यांची फार भीती वाटते. कारण, आपल्याला त्यांची भाषा समजत नाही आणि त्यांनाही आपली भाषा समजत नाही. अशा स्थितीत जेव्हा माणूस आणि जंगली प्राणी समोर येतात तेव्हा ते एकमेकांना शत्रूच मानतात. अशातच जर एखादा साप किंवा अवाढव्य अजगर समोर आलं तर पळता भुई थोडी होते. साप लहान असो किंवा मोठा, विषारी असो किंवा बिनविषारी त्याला पाहिल्यावर भीती वाटल्याशिवाय राहत नाही.
अजगर विषारी नसला तरीही, त्याच्या अवाढव्य आकारामुळे आणि प्राणी गिळून घेण्याच्या सवयीमुळे त्याची भीती वाटते. असं म्हणतात की, अजगराच्या विळख्यात सापडेल्या व्यक्तीची किंवा प्राण्याची सुटका करणं फार कठीण काम आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका पाच वर्षीय मुलाच्या आजोबा आणि वडिलांनी हे शक्य करून दाखवलं आहे.
बाप-लेकाच्या जोडीनं पाच वर्षांच्या ब्यू ब्लेकची अजगराच्या तावडीतून सुटका केली आहे.
हे ही पाहा : हे ही पाहा : एक सिंह आणि 14 म्हशी, कोणाची होईल शिकार? Video पाहा आणि तुम्हीच ठरवा
ऑस्ट्रेलियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यू साउथ वेल्समधील बायरन बे या समुद्र किनाऱ्यावरील शहरात एका मोठ्या अजगरानं पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता. एवढंच नाही तर अजगरानं मुलाचे पाय घट्ट पकडून जवळच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. मुलाच्या 76 वर्षांच्या आजोबा आणि वडिलांनी मिळून मुलाचा जीव वाचवला.
मुलाचे वडील बेन यांनी शुक्रवारी (25 नोव्हेंबर) 3AW या मेलबर्न रेडिओ स्टेशनला या घटनेबद्दल सांगितलं. या माहितीनुसार, पाच वर्षांचा ब्यू ब्लेक पोहण्यासाठी घराजवळील स्विमिंग पूलजवळ गेला. त्यावेळी 10 फूट लांबीच्या अजगरानं त्याच्यावर हल्ला केला. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा अजगर मुलाच्या लांबीपेक्षा तीनपट मोठा होता.
अजगरानं ब्लेकच्या पायाला पकडून पाण्यात उडी मारली. हे दृश्य बघितल्यानंतर ब्लेकचे आजोबा एलन यांनी पूलमध्ये उडी मारली. बेननं सांगितलं की, त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी मिळून 15 ते 20 सेकंदात लहानग्या ब्लेकची अजगराच्या तावडीतून सुटका केली. यानंतर, बेनने सुमारे 10 मिनिटं अजगराला धरून ठेवलं. अजगराला पुन्हा जंगलात सोडण्यापूर्वी बेन यांनी मुलाला आणि आपल्या वडिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
हे ही पाहा : अजगराचा हरणाला विळखा, खेळ खल्लास होणार इतक्यात... थरारक घटनेचा Video Viral
बेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ब्लेकच्या पायावरील रक्त स्वच्छ करून त्याला धीर दिला. अजगर विषारी नाही त्यामुळे त्याला काहीही होणार नाही, असंही सांगितलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं. काही वेळातच त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं. त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बेन यांच्या मते, घरा जवळच्या झाडीत अजगर दडलेला होता. तो पक्षी किंवा प्राण्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. कारण, त्याने काही सेकंदांतच ब्लेकचे पाय पकडले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Python, Shocking video viral, Snake, Viral, Viral news