मुंबई, 1 जून- लहान मुले त्यांच्या खेळण्यांना (Toys) जीवापाड जपत असतात. आवडत्या खेळण्यांना ते स्वत:पासून कधीही दूर होऊ देत नाहीत. बालपणी निर्जीव बाहुली-बाहुल्याचा विवाह सोहळा साजरा केल्याचं आजही अनेकांना आठवत असेल. निरागस बालपणी या गोष्टी होत असतील तर याचे कौतुक वाटेल; पण ऐन तारुण्यात कुणी जर खेळण्याच्या प्रेमात पडत असेल आणि त्या खेळण्याशी लग्न करण्याची तयारी दाखवत असेल तर ही आश्चर्याचा धक्का देणारी बातमी ठरू शकते. असंच काहीसं जर्मनीतील 23 वर्षांच्या सारा रोडो या तरुणीच्या बाबतीत घडलं आहे. ती एका खेळण्यातील विमानाच्या (Toy Plane) प्रेमात पडली आहे. या विमानाला ती आता सर्वस्व मानत आहे आणि त्याच्यासोबत विवाह करण्याची तयारीही तिनी केली आहे. साराच्या टॉय प्लेनवरील या अनोख्या प्रेमाचं वृत्त ‘दैनिक भास्कर हिंदी’ने दिलं आहे.
सारा राडो ही जर्मनीतील डॉर्टमंडमध्ये वास्तव्यास आहे. तिला आधीपासूनच टॉय प्लेन खूप आवडायचं. ती जशी मोठी होत गेली तसं प्लेनबद्दलचं आकर्षण अधिक वाढत गेलं. सद्यस्थितीत साराकडे या टॉय प्लेनची 50 पेक्षा अधिक मॉडेल्स आहेत. सारा या प्लेनला डिकी या नावाने हाक मारते. टॉय प्लेनसोबत संपूर्ण जीवन व्यथित करण्याचं साराने ठरवलं असलं तरी जर्मनीतील कायदा याला मान्यता देत नाही. तिथे एखाद्या निर्जीव वस्तूशी विवाह करणं बेकायदेशीर आहे.
पुरूषांशी बेबनाव झाल्यानंतर निर्जीव वस्तूंकडे आकर्षित झाली सारा
एखाद्या खेळण्यावर प्रेम करावं की नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे; पण तज्ज्ञांच्या मतानुसार, असं निर्जीव वस्तूंवर प्रेम जडण्याला ‘ऑब्जेक्टोफिलिया’ (Object philia) म्हणतात. हा एक प्रकारचा आजार असून, यात एखाद्या निर्जीव वस्तूंकडे व्यक्ती आकर्षित होत असते. याच कारणामुळे साराही सध्या चर्चेत आली आहे. तिच्या नातेवाईकांनी म्हटलं की, ती आधी पुरूषांशी नातेसंबंधात होती. त्यांच्यासोबत बेबनाव झाल्यानंतर ती निर्जीव वस्तूंकडे आकर्षित झाली. टॉय प्लेनच्या आधी साराला रेल्वे गाडीबद्दल आकर्षण वाटत होतं.
(हे वाचा: बापरे! एका सवयीचा इतका भयानक परिणाम; वयाच्या तिशीतच 80 वर्षांची म्हातारी झाली तरुणी **)**
मित्रमंडळींकडून मिळतो पाठिंबा
‘द सन’ या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, साराला टॉय प्लेनबद्दल असणारं प्रेम तिच्या मित्रांनाही माहिती आहे. त्यांचा पाठिंबा सदैव तिच्यासोबत असतो. एका मुलाखतीत सारा म्हणाली की, ‘माझ्या टॉय प्लेनचं नाव डिकी असून, मी याला जीवापाड जपते. मला प्लेनचं इंजिन, पंख आणि त्याची बनावट खूप आवडते. अनेकजण डिकीवरील माझं प्रेम समजू शकत नाहीत; पण माझे मित्र मात्र ही बाब नीट समजून घेऊ शकतात.’
तरुण-तरुणी, ज्येष्ठ आणि लेस्बियन व्यक्तींच्या परस्परांवरील प्रेमांच्या अनेक बातम्या आपण वाचतो, ऐकतो; पण निर्जीव वस्तूंवर केलं जाणारं प्रेम खूप दुर्मिळ असतं. वास्तविक पाहता निर्जीव वस्तूंवर प्रेम करणारी व ‘ऑब्जेक्टोफिलिया’ हा आजार असलेली सारा एकटी महिला नाही. याआधी बुडापेस्टमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय सँड्राचाही टॉय प्लेनवर जीव जडला होता.