कोलकाता, 26 एप्रिल : प्रसूतीवेळी अडलेल्या बाईच्या मदतीला इंजिनीअरिंगचे 3 विद्यार्थी धावून यावेत आणि इन्व्हर्टर, मोबाइलची बॅटरी, व्हॅक्युम क्लीनर यांच्या साह्याने सुखरूप प्रसुती व्हावी, असा थ्री इडियट्स चित्रपटातला प्रसंग वास्तवात घडू शकतो का याबाबत अनेकांना शंका असेल; मात्र कोलकाता इथल्या एका मेडिकल कॉलेजमध्ये अगदी याच पद्धतीनं डॉक्टरांनी प्रसंगावधान राखून रुग्णाचा जीव वाचवला. ऑपरेशन सुरू असताना अचानक लाइट गेल्याने डॉक्टरांनी मोबाइलमधल्या फ्लॅश लाइटच्या उजेडात शस्त्रक्रिया पूर्ण केली. कोलकाता मेडिकल कॉलेजच्या पहिल्या मजल्यावरच्या सर्व्हर रूममध्ये मंगळवारी अचानक आग लागली. साधारणपणे दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली. थोड्या वेळाने ही आग दुसऱ्या मजल्यावरही पसरली. आग लागल्यामुळे हॉस्पिटलमधली वीज बंद करावी लागली; मात्र त्याच वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये 41 वर्षांच्या एका महिलेचं ट्यूमरचं ऑपरेशन सुरू होतं. ट्यूमरसोबत रुग्णाची किडनीही काढली जाणार होती. अशा वेळी भूल दिलेल्या अवस्थेत रुग्णाला किती वेळ तसंच ठेवायचं हा डॉक्टरांसमोर प्रश्न होता. लाइट कधी सुरू होणार तेही समजत नव्हतं. Pizza खाताय सावधान! किमान एकदा या लिंक क्लिकवर करून पाहा; नाहीतर पस्तावाल ऑपरेशन थिएटरमध्ये उद्भवलेल्या आणीबाणीच्या प्रसंगात उपस्थित डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत एक धाडसी निर्णय घेतला. डॉ. सुनिर्मल चौधरी म्हणाले, “साधारण 2च्या सुमाराला आम्ही ऑपरेशन सुरू केलं. रुग्णाच्या किडनीतला ट्युमर काढायचा होता. अचानक आग लागली व लाइट गेले. रुग्णाला त्या अवस्थेत तसंच ठेवणं शक्य नव्हतं. उरलेलं 45 मिनिटांचं ऑपरेशन आम्ही लाइटच्या पर्यायी व्यवस्थेवर केलं. हा अनुभव खूपच वेगळा होता. आता रुग्णाची तब्येत ठीक आहे.” “पहिल्यांदा हे ऑपरेशन टॉर्चच्या प्रकाशात करायचं ठरवण्यात आलं; मात्र हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने सगळीकडे धूर पसरला होता. अशा परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये टॉर्च शोधणं शक्य नव्हतं. त्यामुळे मोबाइलच्या फ्लॅश लाइटच्या प्रकाशात ऑपरेशन करायचं मी ठरवलं. ते वेळेत पूर्ण झालं,” असं चौधरी यांनी सांगितलं. या संदर्भात कोलकाता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर अंजन अधिकारी म्हणाले, की “रुग्णांना ऑपरेशन सुरू असताना तसंच सोडता येत नाही. आमच्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन रुग्णाचे प्राण वाचवले आहेत. आम्हाला याचा अभिमान वाटतो आहे.” OMG! डॉक्टर की जादूगार? ऑपरेशनशिवाय फक्त 3 मिनिटांत चिमुकल्याच्या घशातून बाहेर काढलं नाणं; कसं ते पाहा VIDEO आग पसरू लागल्यावर हॉस्पिटलमधली अग्निशमन यंत्रणा व इतर 3 अग्निशामक बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे काही काळ रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण होतं; मात्र या घटनेनंतर एका तासाच्या आत संपूर्ण आग व धूर आटोक्यात आला. त्या दिवशी नियोजित असलेल्या अन्य दोन शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.