मुंबई, 20 जानेवारी : राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता. 2015 मध्ये त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालं. मराठवाड्यातील एका पोलिसाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर आर आबांचा फोटो भावाच्या लग्नपत्रिकेवर छापला आहे. बीड तालुक्यातील चऱ्हाटा इथल्या नितीन बाबासाहेब जाधव या तरुणाची ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आर आर पाटील हे 2014 मध्ये राज्याचे गृहमंत्री होते. त्यावेळी पोलिसांत 11 हजार जणांची मेगाभरती झाली होती. या मेगाभरतीमध्ये पोलीस नोकरी मिळाल्याची आठवण आणि त्यासाठी आर आर पाटील यांची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून चऱ्हाटा इथल्या कृष्णा जाधव यांनी भावाच्या लग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापला आहे. शनिवारी हा लग्नसोहळा पार पडला.
जनतेचे प्रेम व आपुलकी उधार मिळत नसते ती कमवावी लागते.आबांच्या पारदर्शक पोलीस भरतीमुळे माझ्या मुलाला नोकरी लागली हि भावना मनात ठेवुन आबांचा फोटो लग्नपत्रिकेत लावुन प्रेम व कृतज्ञ भावना बीड जिल्ह्यातील जाधव कुटुंबीयांनी व्यक्त केली.
— Ashish Mete (@IAshishMete) January 18, 2020
सलाम आबा 🙌🙌 pic.twitter.com/n7If3RkFVK
लग्नपत्रिकेवरील फोटोबद्दल सांगताना कृष्णा जाधव म्हणाले की, माझ्या लग्नपत्रिकेवर आबांचा फोटो छापायचा होता. पण 2016 मध्ये माझ्या लग्नात अशी पत्रिका छापता आली नाही. ही इच्छा आता भावाच्या लग्नात पूर्ण झाली. तेव्हा जर मेगाभरती झाली नसती तर पोलिसात भरती होता आलं नसतं अशी भावना कृष्ण जाधव यांनी व्यक्त केली. 2014 मध्ये झालेल्या मेगाभरतीत कृष्णा जाधव हे पोलिसात रूजू झाले. सध्या बीड वाहतूक शाखेत ते सेवा बजावत आहेत. कृष्णा जाधव यांचा भाऊ नितीन जाधव हेसुद्धा पोलिसात आहेत. 2016 मध्ये भरती झालेले नितीन जाधव बीड शहर पोलिस ठाण्यात सेवा बाजवत आहेत. वाचा : पुण्यात अजितदादांनी लावला कामाचा धडाका, काँग्रेसने घातला खोडा!