Home /News /viral /

ते प्रचंड थकलेत, आता तरी काळजी घ्या! आरोग्य यंत्रणेवर ताण, नर्सचा भावुक करणारा फोटो होतोय VIRAL

ते प्रचंड थकलेत, आता तरी काळजी घ्या! आरोग्य यंत्रणेवर ताण, नर्सचा भावुक करणारा फोटो होतोय VIRAL

शारीरिक आणि मानसिक ताण सोसत कोरोना योद्धे (Corona Warriors) लढत आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली 16 एप्रिल: कोरोना विषाणूचा (Corona Virus Pandemic) प्रादुर्भाव जगभरात पसरल्याला आता एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. अजूनही या महाभयानक संकटातून जगाची सुटका झालेली नाही. लस आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे; पण विषाणूचा प्रादुर्भाव रोखणं शक्य झालेलं नाही. सगळं जग या संकटाशी लढण्यात व्यस्त आहे. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे ती आरोग्य यंत्रणा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून डॉक्टर्स, नर्सेस आदींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवण्यासाठी जी लढाई सुरू केली आहे, तिला अद्याप उसंतदेखील मिळालेली नाही. त्यांचे काम अथक सुरू आहे. रात्रीचा दिवस करून लोकांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. शारीरिक आणि मानसिक ताण सोसत हे कोरोना योद्धे (Corona Warriors) लढत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल जगभरातील नेत्यांनी आणि जनतेनंही घेतली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची प्रशंसा केली जात आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात आहे; तरीही काही लोक असे आहेत ज्यांना याची काहीही जाणीव नाही. बेफिकीरपणे वागून ते कोरोनाच्या फैलावाला मदत करत आहेत, हे दुर्दैव! अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक पोस्ट वंदना महाजन (Vandana Mahajan) यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. आपल्या देशात (India) कोरोनाची दुसरी लाट (Second Wave)अतिशय वेगाने संसर्ग फैलावत आहे. गेल्या वेळेपेक्षा आता रुग्णांची संख्या प्रचंड आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे; मात्र अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी अथक काम करत आहेत. त्यांची अवस्था किती वाईट झाली आहे, याची साक्ष देणारा एक फोटो महाजन यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये एक नर्स श्वास घ्यायलादेखील त्रास होणारं पीपीई कीट (PPE kit) घालूनच उभ्या उभ्या विश्रांती घेत असलेली दिसत आहे. वंदना महाजन या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करत असून त्यांना कोविड-19ची लागण झाल्यानं सहा दिवस त्या रुग्णालयात होत्या. त्या काळात त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस किती कठीण परिस्थितीत काम करत आहेत हे अनुभवलं. डॉक्टर, नर्सेस यांच्याशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या एका नर्सने त्यांना सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून प्रदीर्घ काळ ती वसतिगृहातच राहात होती. तिचा नवरा गल्फमध्ये काम करत असल्यानं तिनं मुलांना आपल्या नातेवाईकांकडं ठेवलं होतं. पण आता तिच्या मुलाला अभ्यासासाठी तिच्या मदतीची गरज आहे, त्यामुळं ती घरीगेली आहे. रोज घरी जाताना तिला प्रचंड ताण असतो. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला, मुलांना संसर्ग होणार नाही ना याची तिला सतत भीती, काळजी वाटत असते. एका रुग्णाला सीपीआर उपचार देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याचं निधन झाल्यानं दुःखी झालेल्या एका नर्सनेही महाजन यांच्याशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर्स, नर्सेस, यांच्यासह रुग्णालयातील सफाई कामगार आणि अन्य कर्मचारी यांच्यावरही कामाचा प्रचंड ताण आहे. अनेकांचे शारीरिक स्वास्थ बिघडले आहे. कामाच्या वाढलेल्या वेळा, जेवण-खाणाची अनिश्चितता यामुळे अनेकांच्या शरीराचे बायलॉंजिकल क्लॉक (Biological Clock) विस्कळीत झालं आहे. अनेकांना पोटाचे विकार झाले आहेत, तोंडात फोड आले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना तर मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड (Sanitary Pad) बदलणेसुद्धा अवघड झाले आहे. पीपीई कीट घालून ते अशक्य असते आणि कितीतरी तास त्यातच काम करावे लागते, असं महाजन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वंदना महाजन यांच्या या पोस्टला सोशल मीडियावर लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून,डॉक्टर,नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक स्वास्थासाठी त्यांना समुपदेशनासारख्या (Counseling) सुविधा मिळणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान,भारतानं एका दिवसात दोन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांचा विक्रम नुकताच नोंदवला आहे. 2 एप्रिलपासून आतापर्यंत नोंदवला गेलेला हा सर्वाधिकआकडा आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Corona, Corona spread, Counseling, Covid kit, Health

पुढील बातम्या