नवी दिल्ली 30 एप्रिल : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona second wave) थैमान घातलं आहे. गेले काही दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक नव्या रुग्णांची वाढ होत असून मृतांचा आकडाही दररोज उच्चांक गाठत आहे. आतापर्यंत देशभरात दोन लाखांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड नाहीत. आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. तरीही कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस एक करून अक्षरशः घाम गाळून रुग्णसेवा करत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली आहे. अशात पीपीई किट (PPE Kit) घातल्यानंतर प्रचंड उकडतं. त्यात या उन्हाळ्यामुळे तर अगदीच बिकट अवस्था होते. तरीही डॉक्टर्स रुग्णसेवा करत आहेत. पीपीई किट काढल्यानंतर अंगावरून घाम निथळत असलेल्या एका तरुण डॉक्टरचा फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. लोकांनी त्या डॉक्टरचं कौतुक केलं आहे. डॉक्टर सोहिल (Doctor Sohil) असं त्यांचं नाव आहे. 28 एप्रिल रोजी त्यांनी आपला फोटो ट्विटरवर (Twitter) शेअर केला होता. दोन फोटोंचं कोलाज असलेल्या या फोटोत एका बाजूला त्यांचा पीपीई किट घातलेला फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला पीपीई किट काढल्यानंतर घामाने भिजलेल्या स्थितीतला फोटो आहे. ‘देशाचा सेवक असल्याचा अभिमान वाटतो,’ अशी ओळ त्यांनी फोटोसोबत लिहिली आहे.
Proud to serve the nation pic.twitter.com/xwyGSax39y
— The Viral Doctor 🇮🇳🩺 (@DrSohil) April 28, 2021
आतापर्यंत हा फोटो 1,23,000 जणांनी लाइक केला आहे. तसंच 15,500 जणांनी हा फोटो रिट्विट केला आहे. 2800 जणांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. त्याच ट्विटर थ्रेडमध्ये दुसऱ्या दिवशी डॉ. सोहिल यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘सगळे डॉक्टर्स (Doctors) आणि आरोग्य कर्मचारी (Health Workers) यांच्या वतीने मी बोलतो आहे. आम्ही आमच्या कुटुंबापासून दूर राहून प्रचंड काम करत आहोत. कधी तरी पॉझिटिव्ह पेशंटपासून फूटभर अंतरावर, तर कधी गंभीर आजारी असलेल्या वृद्धांपासून इंचभर अंतरावर राहून. सर्वांनी लसीकरण (Vaccination) करून घ्यावं, असं आवाहन करतो. यातून बाहेर येण्याचा तोच एक मार्ग आहे,’ असं त्यांनी लिहिलं आहे. हा फोटो पाहून लोकांनी त्यांना सलाम केला आहे, तसंच स्वतःचे प्राण संकटात घालून लोकांची सेवा (Corona Warriors) करणाऱ्या देशातल्या सर्व डॉक्टर्सना लोकांनी वंदन केलं आहे.