लाहोर, 2 सप्टेंबर : काही राजकारणी (Politician) हे त्यांच्या कामापेक्षा माकडचाळ्यांमुळेच जास्त ओळखले जातात. त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या विनोदी कृत्यांचीच चर्चा जास्त होते. पाकिस्तानचे (Pakistan) पंजाब प्रांताचे (Punjab Region) मंत्री फैयाज उल हसन चौहान (Minister Faiyaz ul Hasan Chouhan) हे अशांपैकीच एक. चौहान यांच्या एका कार्यकर्त्यानं त्यांना एका दुकानाच्या उद्घाटनासाठी बोलावलं होतं. उद्घाटनाची जंगी तयारी करण्यात आली होती. या ठिकाणी मंडळीदेखील मंत्री महोदय येण्याच्या आधीपासून हजर होती. उद्घाटनासाठी फितदेखील लावण्यात आली होती. त्यानंतर सर्वांसाठी खास मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्रीमहोदयांनी उद्घाटनासाठी होकार दिल्यामुळे दुकानदारदेखील खूश होता. ठरलेल्या वेळेत मंत्रीमहोदय आले. त्यांनी आल्या आल्या उद्घाटनाची औपचारिकता पार पाडायचं ठरवलं. उद्घाटनासाठी ज्या ठिकाणी फित कापायची होती, तिकडं ते गेले. त्यासाठी त्यांना एक कात्री देण्यात आली. ही कात्री हातात घेऊन त्यांनी फित कापण्याचा प्रयत्न केला. मात्र ही फित काही कापलीच गेली नाही. त्यांनी पुन्हा एकदा त्याच कात्रीचे फित कापण्याचा प्रयत्न केला. मात्र बहुदा कात्रीला धार नसल्यामुळे ती फित काही कापली गेली नाही.
हे वाचा - काबुलचं बंद विमानतळ सुरु करण्याचं काम कतारकडे, उद्यापासून उडणार Domestic Flights त्यानंतर दुसऱ्या कात्रीसाठी उपस्थितांनी धावाधाव सुरु केली. मात्र तेवढ्या वेळ थांबण्याची काही मंत्रीमहोदयांची तयारी नव्हती. त्यांनी कात्री ठेऊन दिली आणि थेट आपल्या दातांचा वापर केला. त्यांनी ती फित आपल्या दातात फकडली आणि ती तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्या प्रयत्नात त्यातही यश आलं नाही. मग मात्र ते चांगलेच हट्टाला पेटले आणि दुसऱ्या प्रयत्नात दातानं ती फित कापून उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली. या सगळ्यात उपस्थितांची हसून हसून अक्षरशः पुरेवाट झाली. मंत्रीमहोदयांचं हे रुप पाहून अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.