नवी दिल्ली, 24 मे : आपल्या डोळ्यांना जे दिसतं, ते दृश्य मेंदूपर्यंत संदेशाद्वारे पोहोचवलं जातं आणि मेंदूत त्याबद्दलची प्रतिमा तयार होते. त्यानंतर आपल्याला ती गोष्ट काय आहे, याचं आकलन होतं. आपल्या पाहण्याच्या क्रियेमधले हे मूलभूत टप्पे सर्वांनाच माहिती आहेत; मात्र डोळ्यांना अनेकदा भ्रमही होतात. म्हणजेच समोर असते एक गोष्ट; मात्र आपल्याला भास दुसऱ्याच गोष्टीचा होतो. यालाच Optical Illusion असं म्हणतात. ऑप्टिकल इल्युजनमुळे डोळे आणि पर्यायाने मेंदूचा गोंधळ होतो. असे ऑप्टिकल इल्युजन्स सध्या ऑनलाइन विश्वात एकदम ट्रेंडिंग (Trending) आहेत. ऑप्टिकल इल्युजन्स असलेली चित्रं किंवा व्हिडिओज अनेक जण शोधून शेअर करत आहेत. त्यानंतर त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न बहुतांश जण करत आहेत. डोळ्यांना असाच भ्रम करणारा एक व्हिडिओ अलीकडेच समोर आला आहे. त्याने नेटकऱ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. 'इंडियाटाइम्स'ने त्याबद्दलचं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
factsdaily नावाच्या इन्स्टाग्राम चॅनेलवरून एक व्हिडिओ 12 मे रोजी शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओला आतापर्यंत 39 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावरूनच या व्हिडिओत काही तरी खास आहे, याची कल्पना येते. हा व्हिडिओ christian kesniel याने तयार केला असून, त्याने त्याच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर एप्रिल महिन्यात तो व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओलाही जवळपास तीन लाख लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?
या व्हिडिओत christian kesniel स्वतः नाचताना दिसत आहे. व्हिडिओ एडिटिंग (Video Editing) करताना त्याने स्वतःच्या पाच प्रतिमा तयार केल्या असून, ते पाच जण नाचताना दिसत आहेत. या पाचही जणांनी जांभळ्या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या आणि नारिंगी अशा पाच वेगवेगळ्या रंगांची Hoodie घातली आहे.
हे पाचही जण नाचतात आणि स्वतःभोवती गिरकी घेतात आणि पुन्हा नाचायला सुरुवात करतात. व्हिडिओ सुरू होतो, तेव्हा सगळ्यात पुढे असलेल्या व्यक्तीने हिरवी हूडी (Green Hoodie) घातलेली दिसते. ते सारे जण नाचताना आपण पाहत राहतो; मात्र जेव्हा ते गिरकी घेतात, तेव्हा पुन्हा एकदा हिरव्या रंगाची हूडी घातलेला मनुष्य पहिल्या स्थानावर आलेला दिसतो. दरम्यानच्या काळात पहिल्या स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या हूडीचा रंग कधी बदलला होता, हे आपल्या लक्षातच येत नाही. हे पाहणारा प्रत्येक जणच चक्रावून जात आहे. नेमकं काय घडतंय हे पटकन कळतच नाही.
अगदी बारकाईने आणि पुनःपुन्हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येतं, की सर्वच हूडीजचा रंग हळूहळू बदलतच असतो. जेव्हा ते स्वतःभोवती गिरकी घेतात, ती स्टेप येईपर्यंत तो रंग पूर्ण बदललेला असतो. त्यामुळे गिरकी घेताना अचानकच रंग बदलला असं आपल्याला वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं नाही.
या व्हिडिओचं नेटिझन्सनी कौतुक केलं आहे. अनेकदा पाहिल्याशिवाय यातली गंम्मत कळतच नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. एवढं उत्तम व्हिडिओ एडिटिंग करूनही Christian स्वतःला प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर म्हणत नाही. त्याच्या फॉलोअर्सना थक्क करून सोडणारी कामगिरी त्याने अनेकदा केली आहे.
त्याने हा रंग बदलणाऱ्या हूडीचा, व्हायरल झालेला व्हिडिओ कसा एडिट केला, याबद्दल एका यू-ट्यूब व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. 'मी केवळ हिरवा रंग आयसोलेट केला. तोच हूडीचा/जॅकेटचा खरा रंग आहे. Hue, Saturation आणि Lightness इफेक्ट ऑन केले, तर जॅकेटचा खरा रंग दिसू शकेल,' असं तो म्हणतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.