खेड, 14 जुलै : विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राजकारण्यांच्या आणि विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली. रुग्णवाहिका नसल्यामुळे 90 वर्षांच्या आजोबांना लाकडाला झोळी करून नेण्याची नामुष्की ओढावली. खेड तालुक्यातील कावळे गावातील जानकरवाडी इथं ही घटना घडली. या गावातील 90 वर्षीय गोविंद पांडुरंग जानकर यांनी तब्बेत अचानक खालावल्याने त्यांना चक्क एक लाकडाला बांधून पाच ते सहा किलोमीटर ग्रामस्थांनी उचलून जंगलातील पायवाटेने मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागले आणि नंतर दवाखान्यात नेवून त्यांचा जीव वाचवण्यात आला.
35 ते 40 लोकसंख्या असणाऱ्या या वाडीमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून रस्ताच नाही. येण्या-जाण्यासाठी या गावातील लोकांना घनदाट जंगलातून पाय वाटेनं यावं लागतं. वाडीत कुण आजारी पडलं किंवा एखादी दुर्घटना घडली की, गोविंद जानकर यांच्या प्रमाणे लाकडाला झोळी करून अथवा डोली तयार करून न्यावं लागते. नुकसान 2.5 लाखाचे, सरकारकडून चेक 5 हजाराचा, शेतकरी म्हणाला,‘राहु द्या तुम्हालाच’ दोन महिन्यांपूर्वी चिपळूण तालुक्यात देखील अशाच प्रकारे धनगर वाडीतील एका गर्भवती महिलेला डोलीतून दवाखान्यात घेऊन जात असताना जंगलातच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली होती. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम आणि जंगलमय भागातील या लोकांचा वनवास थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.