नवी दिल्ली, 18 मार्च : सोलो ट्रिपला कुठे गेल्यावर सर्वांत मोठी अडचण असते ती फोटो काढण्याची. गुजरातच्या पाटण जिल्ह्यातल्या 'राणी की वाव'ला भेट देत असलात, तर तुम्हाला ही अडचण येणार नाही. कारण तिथले दोन सिक्युरिटी गार्ड्स अगदी नम्रतेने तुम्हाला इन्स्टाग्रामवर टाकता येण्यासारखे सुंदर फोटो काढून देतात. तेही अगदी मोफत, एका स्माइलवर.
न्यूज 18च्या निवेदिता सिंग यांनी आपला अनुभव लिहिला आहे. त्या लिहितात, 'सोम चंद आणि हर्ष हे दोन्ही मध्यमवयीन पुरुष या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून ड्युटीवर आहेत. जेव्हा ते पर्यटकांना फोटो काढताना येणाऱ्या अडचणी पाहतात तेव्हा ते त्यांना मदत करतात. "किमान मला संधी तरी द्या," असं मला फोटो काढताना धडपडताना पाहून हर्ष म्हणाले. थोड्या संकोचानंतर मी माझा फोन दिला आणि फोटो पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला, इतके सुंदर फोटो त्यांनी काढले होते. हर्ष यांनी क्लिक केलेले फोटो आयआरटीसीटीसीच्या 'गरवी गुजरात' ट्रेनमधून माझ्या गुजरातच्या सहलीत गोळा केलेले सर्वोत्तम फोटो होते.'
हेही वाचा - रील बनवण्याच्या नादात कॉलेजच्या छतावरून पडला विद्यार्थी, एका व्हिडिओसाठी गमावला जीव
फोटो काढल्यानंतर पैशांसाठी विचारलं असता “आम्ही दिवसभर इथेच असतो, जेव्हा मी एखाद्याला फोटोसाठी धडपडताना पाहतो, तेव्हा मी मदत करतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला समाधान देतं. मी त्या बदल्यात पैसे मागत नाही' पण कुणी दिले तर घेतो," असं ते न्यूज18 शी बोलताना म्हणाले. 11व्या शतकातल्या या ऐतिहासिक पर्यटनस्थळी फोटो काढून मागण्यासाठी हर्ष आणि सोम चंद यांच्याभोवती गर्दी असते.
“मी गेल्या 15 वर्षांपासून इथे काम करतो आणि 10 वर्षांपासून फोटो क्लिक करतो. पूर्वी एवढे पर्यटक नसायचे. एके दिवशी मी पायऱ्यांवर बसून काही फोटो क्लिक केले. ते छान आले. सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. म्हणून मी प्रयोग करू लागलो. आता मी फोन आणि फोटोग्राफीमध्ये कंफर्टेबल झालोय” असं सोम चंद म्हणाले.
हेही वाचा - पाणघोड्यांनी सिंहाची हवा केली टाईट, भरपाण्यातून सिंहाला ठोकावी लागली धूम, पाहा Video
दोघंही टेक्नॉसॅव्ही आहेत, त्यांनी अनेक प्रकारचे फोन वापरलेत. त्यामुळे ते आता कोणताही फोन सहज हाताळतात. दरम्यान, “मी पैसे मागत नाही. लोक फोटो पाहून खूश होतात, यात मी समाधानी असतो. आम्ही प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स आहोत. आमचा पगार जास्त नाही. मला तीन मुली आहेत. त्यामुळे कोणी प्रेमाने पैसे दिले तर आम्ही नाकारत नाही, त्याने कुटुंब चालवण्यास मदत होते," असं सोम चंद म्हणाले.
पाटण इथली 'राणी की वाव' चालुक्य राजघराण्यातल्या राणी उदयमती यांनी 1063मध्ये पती भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ बांधली होती. ही वाव त्या काळातल्या उत्कृष्ट कारागिरीचा नमुना आहे. अनेक वर्षं ती गाळाखाली दबली गेली होती. 1940च्या दशकात ती पुन्हा शोधण्यात आली आणि 1980च्या दशकात भारतीय पुरातत्त्व खात्याने ती पुनरुज्जीवित केली. 2014पासून ती युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Photoshoot, Viral