अॅमस्टरडॅम, 2 जानेवारी : मानवी शरीर ही एक अतिशय गुंतागुंतीची रचना आहे. त्यामुळे त्याबाबत सातत्यानं संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये विविध शोध लागतात. नेदरलँडमधील संशोधकांनी मानवी शरीराशी संबंधित एक नवीन घटक शोधला आहे. तेथील ऑन्कोलॉजिस्टनी (कर्करोग तज्ज्ञ) मानवी चेहऱ्यातील नवीन ग्रंथी (पेशी समूह) शोधल्या आहेत. या ग्रंथींना ट्युबरिअल (क्षयग्रंथी) असं नाव देण्यात आलं आहे. रेडिओथेरपी आणि ऑन्कोलॉजी या पीअर-रिव्ह्युव्ड जर्नलमध्ये या संबंधित संशोधन प्रकाशित झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, डोकं आणि मानेतील कर्करोगाच्या प्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संशोधकांनी रेडिओअॅक्टिव्ह ग्लुकोजसह मानवी शरीराचं स्कॅनिंग केलं. या स्कॅनमध्ये मानवी चेहऱ्याच्या आत काही असामान्य दिसणाऱ्या पेशी आढळल्या. या पेशी समूहाला ट्युबरिअल असं नाव देण्यात आलं. ट्युबरिअल ग्रंथी तोंडातील लाळेच्या निर्मितीमध्ये भाग घेतात. हा नवीन अवयव साधारणपणे तीन मुख्य लाळ ग्रंथींइतकाच आहे. तो नासोफरिनक्सच्या दोन्ही बाजूला स्थित आहे. संशोधकांनी सांगितलं की, त्यांनी या शोधासाठी पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅनचा वापर केला. ऑन्कोलॉजिस्ट्सनी जवळपास 100 रूग्ण आणि मृतदेहांचं स्कॅनिंग केलं. तेव्हा चेहऱ्याचा काही भाग सतत चमकत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबत संशोधकांना आश्चर्यही वाटलं. सुरुवातीला ही एक चूक असल्याचं त्यांना वाटलं. मात्र, पुढील संशोधनात हा चमकणारा भाग एक पूर्णपणे नवीन अवयव असल्याचं लक्षात आलं. हेही वाचा - प्रेग्नन्सीदरम्यान उसाचा रस पिणं सुरक्षित आहे का? या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती हव्याच कॅन्सर उपचार करताना घ्यावी लागेल काळजी संशोधकांनी स्पष्ट केलं की, नवीन शोधलेल्या लाळ ग्रंथीमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट करताना रेडिओथेरेपी दरम्यान गुंतागुंत होऊ शकते. रेडिओथेरेपी करताना डॉक्टरांना चेहऱ्याच्या या नवीन अवयवाला लक्ष्य करणं टाळावं लागेल. पूर्वी असं मानलं जात होतं की, नासोफरिनक्समधील लाळ किंवा म्युकस ग्रंथी खूप लहान असतात आणि संपूर्ण म्युकोसामध्ये समान रीतीनं पसरलेल्या असतात. कॅन्सर हा असा आजार आहे, ज्यावर अद्यापही ठोस उपचार उपलब्ध झालेले नाहीत. कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असताना त्याचं निदान झाल्यास किमोथेरेपीसारख्या उपचार पद्धतींचा वापर करून त्यापासून सुटका मिळवता येते. पहिल्या दोन स्टेजनंतर मात्र, कॅन्सवर मात करणं जवळपास अशक्यच आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी जगभरातील ऑन्कोलॉजिस्ट सातत्यानं प्रयत्नशील आहेत. अशाच प्रयत्नांदरम्यान त्यांना ट्युबरिअल ग्रंथींचा शोध लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.