मुंबई, 7 जानेवारी : मनोरंजन आणि नातलगांच्या संपर्कात राहण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे उत्पन्नाचं प्रभावी माध्यम बनले आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये रस्त्यावर भीक मागताना भिकारी दिसतात. काही जण त्यांना पैसेही देतात. अलीकडे काही भिकारी ऑनलाइन पेमेंट देखील घेतात; मात्र इंडोनेशियातील भिकाऱ्यांची कथा थोडी वेगळी आहे. या देशातले भिकारी चक्क सोशल मीडियाच्या माध्यमातून भीक मागून मालामाल होत आहेत.
फक्त भिकचं नाही तर ते लोकांकडे ऑनलाइन गिफ्टदेखील मागताना दिसतात. यासाठी इंडोनेशियातले भिकारी टिकटॉकचा वापर करत आहेत. या प्रकाराची माहिती सरकारला मिळाली असून, असे प्रकार रोखण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एका भारतीय वृत्तवाहिनीने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
हे ही वाचा : जुगाडात भारतीयांचा हात कोणीच पकडू शकत नाही, हे सिद्ध करणारे काही Viral Photo
इंडोनेशियात एक धक्कादायक प्रकार सुरू आहे. तिथले भिकारी सोशल मीडियाचा वापर करून भीक मागतात. एखाद्या गल्लीत बसून व्हिडिओ चित्रित करून भिकारी हे व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करतात आणि पैसे कमावतात. सध्या या माध्यमातून इंडोनेशियातले अनेक भिकारी मालामाल झाले आहेत. टिकटॉकवरून भीक मागण्याचा नवीन ट्रेंड इंडोनेशियात वेगानं वाढत आहे.
भीक मागण्यासाठी इंडोनेशियातील भिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. हे भिकारी स्वतःचा खास व्हिडिओ तयार करतात. हा व्हिडिओ पाहिल्यावर कोणाही व्यक्तीला त्यांच्यावर दया येते आणि ते पैसे देतात. यामुळे हे भिकारी मालामाल होत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे या कामात इंडोनेशियातल्या वयोवृद्ध महिला सर्वांत आघाडीवर आहेत. या महिला स्वतःच्या अंगावर गाळ ओतून घेतात आणि व्हिडिओ बनवतात.
हे ही वाचा :डोक्यावर पदर घेऊन महिलांचा हटके डान्स, चक्क जमिनीवर लोळण घेत लुटला आनंद
देशात टिकटॉकवर एखाद्या युझरला 1000 पेक्षा अधिक जण फॉलो करत असतील तर त्याला व्हर्च्युअल गिफ्ट मिळतं. त्यामुळे हे भिकारी एक तर व्हर्च्युअल गिफ्ट मागतात किंवा त्या बदल्यात पैसे मागतात. त्यामुळे या देशातल्या भिकाऱ्यांसाठी टिकटॉक हे परफेक्ट अॅप ठरलं आहे. त्यामुळे बहुतांश भिकारी तासन् तास रस्त्यावर भटकत भीक मागण्यापेक्षा टिकटॉकवर विचित्र व्हिडिओ शेअर करून भीक मागताना दिसत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=mRcYCzlieII&t=8s
इंडोनेशिया सरकारने या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने भीक मागणं रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करत असलं, तरी त्यांना अद्याप हे प्रकार रोखण्यात अपेक्षित यश मिळालेलं नाही. आता सरकारने टिकटॉकला गढूळ पाण्यात आंघोळ करतानाचे पोस्ट केलेले व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरून हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे यावर नागरिकांचं मत वेगळं असून आम्ही भिकाऱ्यांना थेट पैसे देऊन चांगलं काम करत असल्याचं नागरिक सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Indonesia, Social media, Tiktok, Tiktok viral video