नवी दिल्ली 15 मार्च : वाइल्डलाईफ फोटोग्राफीसाठी एखाद्या घनदाट जंगलात गेलं किंवा अगदी नुसतं या वन्यप्राण्यांचं दर्शन घ्यायला गेलं तरीही तुमच्या नशिबात असेल तरच तुम्हाला ते प्राणी दिसतात. तुम्ही दिवसभर संपूर्ण जंगल पालथं घातलं तरीही वाघ किंवा बिबट्या दिसत नाही आणि तुम्ही निराश होऊन परतू लागलात की तुमच्या गाडीसमोरून वाघाची सवारी जाते. असा अनुभव अनेकांना आला आहे पण इन्फोसिस आयटी कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांना ब्लॅक पँथर आणि बिबट्या या दोन हिंस्र प्राण्यांचा सामना (Nandan Nilekani Spots Black Panther and Leopard Encounter) पाहाण्याची संधी मिळाली. कर्नाटकमधील हुनसूरमध्ये असलेल्या काबिनी वाइल्डलाईफ सँच्युरीमध्ये त्यांना हा विलक्षण अनुभव घेता आला. नंदन यांनी या सामन्याच्या 54 सेकंदांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओचं क्रेडिट त्यांनी विजय प्रभू यांना दिलं आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एकतर घनदाट जंगलात गेल्यावरही बिबट्या दिसणं दुर्मिळ आणि ब्लॅक पँथर दिसणं तर आणखीन दुर्मिळ. हे दोघं आमने-सामने म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणायला हवं. एका निष्पर्ण उंच झाडावर खालच्या बाजूला साया नावाचा हा ब्लॅक पँथर आहे आणि वरच्या फांदीवर स्कारफेस म्हणजे बिबट्या बसलेला या व्हिडिओत दिसतो आहे. त्यानंतर ब्लॅक पँथर थोडा पुढे जातो आणि त्यांचा सामना सुरू होतो. इथं हा व्हिडिओ संपतो. नंदन यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ‘ आज 6 मार्चला काबिनी अभयारण्यात आम्ही ब्लॅक पँथर आणि त्याचा शत्रू बिबट्या यांच्यातील सामना पाहिला.’ वाइल्डलाईफ फोटोग्राफर शाझ जंग यांच्या म्हणण्यानुसार बिबट्याच्या चेहऱ्यावर प्रचंड खोल जखमा असतात, त्यामुळे त्याला स्कारफेस हे नाव मिळालं असून साया हा काबिनी अभयारण्यातील एकमेव ब्लॅक पँथर आहे. या व्हिडिओला 109.9 K इतके व्ह्युज मिळाले आहेत. 888 जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापैकी बहुतांश जणांना या व्हिडिओच्या पुढे त्या दोन्ही पशुंमध्ये कसं युद्ध झालं हे जाणून घ्यायचं कुतूहल दिसलं त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे.
Saw today, 6th March, in Kabini wild life sanctuary -- another epic encounter between the Black Panther and his adversary Scarface! Video credit: Vijay Prabhu. pic.twitter.com/151Ip1bMGz
— Nandan Nilekani (@NandanNilekani) March 6, 2021
एकानी म्हटलं, ‘वाह असं दृश्य बघण्याचं स्वप्न अस्तित्वात येणं दुर्मिळच.’ दुसऱ्यानी जबरदस्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका ट्विटर युझरनं म्हटलं,‘ वाह नंदन! तुम्हाला हे दृश्य बघायला मिळालं नशीबवान आहात.’ एकानी सल्ला दिला की या अभयारण्यात कुठल्या ठिकाणी हे दृश्य दिसलं ते जाहीर करू नका कारण शिकारी तिथं पोहोचण्याचं भय आहे. नंदन यांच्या पत्नी रोहिणी यांनी टिपलेला ब्लॅक पँथरचा फोटोही नंदन यांनी ट्विट केला आहे. नंदन आणि रोहिणी यांना अभयारण्यात फिरण्याचा छंद आहे हे जगजाहीर आहे. रोहिणी यांना काबिनी अभयारण्य ही विशेष जागा वाटते असं डेक्कन हेराल्डच्या मुलाखतीत म्हटलं आहे.