मुंबई, 10 एप्रिल : सोनं खरेदी करण्याच्या बहाण्याने सोन्याची चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात (Mumbai Gold Theft) आलं आहे. दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महिलेकडून 18 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ज्वेलर्सच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला मुंबईतील वेगवेगळ्या भागातून रोज एका ज्वेलरी शॉपमधून चोरी करत होती. या महिलेवर आतापर्यंत 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या महिलेची विशेष बाब म्हणजे चोरी झाल्याचं कोण्याच्या लक्षात येऊ नये किंवा चोरीची तक्रार दाखल दाखल होऊ नये म्हणून महिला केवळ सोन्याचे कमी वजनाचे बेबी टॉप्स अर्थात लहान मुलांचे कानातले चोरी करत होती. आतापर्यंत 50 हून अधिक ज्वेलरी शॉपमध्ये महिलेने चोरी केल्याची माहिती आहे. ही महिला नालासोपारा इथे राहणारी असून तिने हे चोरी केलेले दागिने कुठे-कुठे विकले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात गुढीपाडव्याला या महिलेची चोरी पकडली गेली. रुपाली ज्वेलर्स नावाच्या सोन्याच्या दुकानात ही महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने गेली. दुकानात तिने बेबी टॉप्स खरेदी करायचे असल्याचं सांगितलं. दुकानातील व्यक्तीने या महिलेसमोर सोन्याचे काही बॉक्स समोर ठेवले आणि इतर डिझाइनचे बॉक्स तो दाखवत होता. त्याचवेळी महिलेने अतिशय शांतपणे, अगदी हुशारीने समोर ठेवलेल्या बॉक्समधील दोन तोळ्याचे बेबी टॉप्स आपल्या बॅगखाली सरकवले आणि संधी साधून चोरी केले. काही वेळाने या महिलेने कोणतंच डिझाइन आवडलं नसल्याचं सांगत तेथून पळ काढला. पण दुकानदाराने दुकानात लावलेला कॅमेरा पाहिल्यानंतर महिलेची चोरी समोर आली. दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी महिलेला नालासोपारा इथून ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीत महिलेने पोलिसांना सांगितलं, की रोज एका सोन्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या नावाने जाऊन सोनं चोरी करण्याचा प्रयत्न करत होती. जर प्रयत्न फसला तर सोनं तिथेच सोडून देऊन पळून जात होती आणि पकडली गेली नाही, तर सोनं घेऊन पळून जात होती. अनेकदा अतिशय कमी ग्रॅमचे दागिने असल्याने दुकानदार तक्रार दाखल करत नसल्याने अनेकदा ही महिला बचावली होती.
हे वाचा - सुसाट BMW ने डिव्हाइडर तोडून स्कूटी चालकाला हवेत उडवलं, भयंकर अपघाताचा थरार VIDEO
या रुपाली ज्वेलर्समध्ये चोरी करण्याआधी महिलेने मालाडमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी केली होती. तिथे ती पकडलीही गेली. पण सोनाराला तिने चोरी केलेलं सोनं परत दिल्याने ती वाचली होती. परंतु रुपाली ज्वेलर्समध्ये झालेल्या चोरीनंतर ही प्रकरण समोर आलं.
आता पोलीस महिलेने चोरी केलेले दागिने कुठे-कुठे विकले याची माहिती घेत आहेत. परंतु महिला अतिशय हुशारीने चोरीचे दागिने कुठे विकले त्या खऱ्या ज्वेलर्सचं नाव, त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. चौकशीदरम्यान महिलेवर अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. काही ज्वेलर्सची दुकानं अशीही आहेत ज्यांनी या महिलेविरोधात अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.