इस्तांबुल, 26 फेब्रुवारी : जेव्हा मुलांवर (children) संकट येतं तेव्हा आई (mother) काहीही करू शकते. मग संकट कितीही मोठं का असेना मुलांसमोर ती ढाल बनून उभी राहते पण मुलांना त्याची किंचितशीही झळ बसू देत नाही. सध्या सोशल मीडियावर (social media) असाच एक व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. ज्यामध्ये एका आईनं आपल्या लेकरांना आगीतून वाचवण्यासाठी जे काही केलं ते पाहून सर्वजण भावुक झाले आहेत.
तुर्कस्तानातील (turkey) इस्तांबुलमधील (istanbul) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका बिल्डिंगमध्ये आग लागल्याचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. जिथं ही आग लागली त्या खोलीत लहान मुलंही होती. त्यांची आईसुद्धा त्यांच्या सोबत होती. आगीचा भडका उडताच आईनं सर्वात आधी आपल्या लेकरांचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली. एकेएक करत तिनं आपल्या चार मुलांना खिडकीतून बाहेर फेकलं.
@DailySabah ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता ही पाच मजली इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे आणि एक महिला खिडकीतून आपल्या मुलांना बाहेर फेकते आहे. तिला असं करताना पाहून क्षणभर काळजाचा ठोकाही चुकतो. पण पुढे व्हिडीओ पाहिल्यानंतर जीवात कुठे जीव येतो.
इमारतीखाली काही लोक उभे आहेत. जे या मुलांना एका चादरीत पकडत आहे. खिडकीतून फेकल्यानंतर मुलांना कोणतीही दुखापत झालेली नाही. खाली उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना सुरक्षितरित्या वाचवलं आहे.
रिपोर्टनुसार प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, सुरुवातीला इमारतीतून धूर येत होता आणि मग मुलांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही बिल्डिंगखाली आलो आणि एक चादर पसरवून धरली. त्यानंतर महिलेनं खिडकीतून आपल्या मुलांना खाली फेकलं आणि आम्ही त्या मुलांना सुरक्षित झेललं. त्यानंतर अग्निशमन दल आलं आणि त्यांनी आग विझवली.