नवी दिल्ली 24 जून : सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. यातील काही व्हिडिओ हसवणारे, काही भावुक करणारे तर काही विचार करण्यास भाग पाडणारे आणि धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा मदारी माकडांना माणसांसारखं वागायला लावतो आणि लोक त्याच्यावर टाळ्या वाजवतात. तुम्ही असेही अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये माकड आपल्या अजब कृत्यांनी लोकांचं मनोरंजन करताना दिसतं. मात्र आता एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड एका मुलीला उचलून पळताना दिसत आहे. माकडाचं हे कृत्य बघून तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी त्याला ट्रेनिंग देऊन हे काम करण्यासाठी पाठवलं आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की माकड एक खेळण्यातील बाईकसारखीच छोटी बाईक घेऊन वेगात तिथे येतं.
यानंतर रस्त्यावर काही मुलं बसलेली दिसतात. हे माकड अचानक येऊन यातील एका लहान मुलीला उचलून नेतं. त्यामुळे मुलगी खाली रस्त्यावर पडते आणि नंतर माकड तिला ओढत पळून जाऊ लागतं. माकड सर्व शक्तीनिशी त्या मुलीला काही अंतरापर्यंत ओढून नेतं. मात्र, काही अंतरावर गेल्यावर एक माणूस माकडाला थांबवतो, त्यानंतर माकड घाबरून मुलीला सोडून देतं आणि तिथून पळून जातं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 3.2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे. त्याचबरोबर युजर्सनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिलं, की माकड स्कूटर चालवत होतं का? अनेकदा लोकांना माकडांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण माकड कधीही माणसांना इजाही करू शकतं.