नवी दिल्ली 04 डिसेंबर : साप (Snake) हा एक असा जीव आहे ज्याची भीती जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला वाटते. साप विषारी असो किंवा नसो, मात्र तो समोर दिसताच अनेकांचा थरकाप उडतो. अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला मागील महिन्यात आपल्या घरामध्ये एक साप फिरताना दिसला. या सापाला मारण्यासाठी त्याने जे काही केला त्याचा पश्चाताप त्याला कदाचित आयुष्यभर होईल. या व्यक्तीने सापाला मारण्यासाठी घराच्या चुलीत जळत असलेला कोळसा उचलला . या कोळशामुळे सापाला काही इजा झाली की नाही हे कळू शकलं नाही, पण त्या व्यक्तीचं संपूर्ण घर जळून राख झालं (Man Burned Down Entire House For One Snake).
ही घटना 23 नोव्हेंबरला रात्री दहाच्या सुमारास घडली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की घरात लागलेली आज विझवण्यासाठी जवळपास 75 फायरफायटर्स पाठवले गेले होते. अनेक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झालं होतं. मोंट्गोमेरी काउंटी फायर अॅण्ड रेस्क्यूचे प्रवक्ते पीट पीरिंगेर यांनी सांगितलं की घरात साप दिसताच या व्यक्तीने जळता कोळसा त्याला फेकून मारला. मात्र याच कोळशामुळे घरात आग लागली.
पीट यांनी ट्विटरवर या घटनेचे फोटो शेअर केले. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं आगीचं कारण अॅक्सिडेंटल होतं. मालकाने सापाला कोळशाने मारण्याचा प्रयत्न केला मात्र कोळशाच्या तुकड्यामुळे घरालाच आग लागली. आगीमुळे या व्यक्तीचं साडेसात कोटी रुपयांचं नुकसान झालं. सर्वात मोठी बाब म्हणजे या घटनेत मोठं नुकसान झालं मात्र सापाचं नेमकं काय झालं हे समजलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आग बेसमेंटमधून सुरू झाली. यानंतर हळूहळू संपूर्ण घरात पसरली. घराचा बहुतेक भाग जळून खाक झाला. यात जवळपास साडेसात कोटीचं नुकसान झालं. सोशल मीडियावर जळणाऱ्या या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अशीच आणखी एक घटना व्हायरल झाली होती. यात एका व्यक्तीने घरात दिसलेल्या कोळीला मारण्याच्या नादात संपूर्ण घराला आग लावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Snake