मुंबई, 22 जुलै: तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच सोशल मीडियाने भुरळ घातली आहे. अगदी छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आपापले फॉलोअर्स टिकवून ठेवण्यासाठी नाना तऱ्हा नेटिझन्स करत असतात. काही वर्षांपासून सोशल मीडियावर वेगवेगळे चॅलेंजेस देण्याचा ट्रेंड आला होता. तो प्रचंड गाजला त्यानंतर हा प्रकार वाढतच गेला आहे. नुकतंच कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ‘लिप लॉक चॅलेंज’चा (Lip Lock Challenge) व्हिडिओ व्हायरल झाला. तो पाहून सर्वच दंग झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ‘जागरण हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चॅलेंज देण्याचा ट्रेंड काही वर्षांपासून बराच प्रसिद्ध झाला. यात प्रामुख्याने ‘आइस बकेट चॅलेज’ , सोलो फोटो , फिटनेस, डान्सिंग चॅलेंज , मूव्ह विथ कार असे असंख्य ट्रेंड आले. यात अबालवृद्धांसह सर्वांनीच तितक्याच उत्साहात सहभाग घेतला. पण कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये समोर आलेला लिप लॉक चॅलेंज पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत. हेही वाचा - VIDEO - हिंदी मीडियम दहावी पास, फाडफाड इंग्रजी बोलून विकतो चणे; हटके स्टाइल पाहून तुम्हीही फॅन व्हाल कर्नाटकातील तरुण-तरुणींचा लिप लॉकचा व्हिडिओ अल्पावधीतच प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका घरातील खोलीत चित्रित करण्यात आल्याचं दिसतंय. यात एकमेकांचं चुंबन घेणाऱ्या तरुण-तरुणीशिवाय त्या खोलीत इतरही विद्यार्थी असल्याचे स्पष्ट दिसतं. तिथं उपस्थित तरुणांपैकी एकजण हा व्हिडिओ बनवत असल्याचं समोर आलं. तर, लिप लॉक किस करताना तरुण-तरुणीला इतर विद्यार्थी चिअर करत असल्याचं दिसतं. व्हिडिओ पाहिल्यानंतर तरुणांचं ते जोडपे लिप लॉकचा विक्रम करत असून, येथे एक प्रकारची स्पर्धा लागली असल्याचं वाटतं. या स्पर्धेत कोण जिंकलं हे या व्हिडिओत तर दिसत नाही, पण या खोलीतील वातावरण मौजमजेचं आहे. या व्हिडिओत अनेक विद्यार्थ्यांनी तर एकमेकांना शारीरिक संबंधांसाठीही चॅलेंज दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. व्हिडिओत दिसणारे सर्व विद्यार्थी कर्नाटकातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांत चिंतेचे वातावरण तरुण-तरुणीच्या लिप लॉक किसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटक राज्यात याची जोरदार चर्चा केली जात आहे. राज्यातील अनेक पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरू पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. लिप लॉक करताना व्हिडिओत दिसणाऱ्या त्या तरुणाला अटक केली. खोलीत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी एकाने हा व्हिडिओ शूट केला व तो सोशल मीडिया शेअर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाचं (Drugs) सेवन केलं होतं की नाही या बाजूनेही प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर दिल्या जाणाऱ्या विविध चॅलेंजमध्ये ग्रामीण भागातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींपासून बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारही सहभागी होतात. विरंगुळा म्हणून विविध चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करताना ते दिसतात. परंतु, लिप लॉकसारखे चॅलेंज व्हायरल होत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







