बिलिनेले, 05 फेब्रुवारी: बिबट्या समोर आला तर एखाद्याची घाबरगुंडी उडेल. अशावेळी बिबट्याबरोबर एका खोलीमध्ये बंद झालो अशी कल्पना सुद्धा केली तरी आपल्याला भीती वाटेल. पण अशी घटना एका कुत्र्याबरोबर घडली आहे. थोडे थोडके नव्हे तब्बल 7 तास एका शौचालयामध्ये बिबट्यासोबत अडकला होता. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला असेल किंवा त्याला मारुन टाकलं असेल अशा शंका तुमच्या मनात येतील. पण असं काहीच घडलं नाही. कुत्रा एकदम सुखरुप आहे.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बिलिनेले गावात ही घटना घडली आहे. याठिकाणी एका शौचालयामध्ये बिबट्या आणि कुत्रा अडकले होते. त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. द न्यूज मिनिटच्या एका पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, 'कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या एका शौचालयात घुसला. एक महिला सकाळी 7 वाजता घराबाहेर असलेल्या शौचालयामध्ये जात होती तेवढ्यात तिची नजर आतमध्ये असलेल्या बिबट्यावर गेली. तिने ताबडतोब शौचालयाच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावली आणि तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.'
प्रज्वल मनिपाल या युजरने आपल्या ट्विटर अकाउंटवर शौचालयात अडकलेल्या बिबट्या आणि कुत्र्याचा फोटो शेअर केला आहे. त्याने ट्वीटच्या माध्यमातून संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन विषयी माहिती दिली आहे. या फोटोमध्ये शौचालयाच्या दरवाजाच्या शेजारी पांढऱ्या रंगाचा कुत्रा बसलेला दिसत आहे. तर काही अंतरावर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये बिबट्या बसलेला दिसत आहे. शौचालयाच्या छतावरील पत्रे काढून हा फोटो काढण्यात आला आहे.
This photo was taken from outside through a gap in the window. It is a leopard and a dog stuck together since this morning inside the toilet of a house in Kadaba, Dakshina Kannada district. I am told the leopard escaped at 2 pm and the dog is alive! pic.twitter.com/hgjJhaXW03
— Prajwal (@prajwalmanipal) February 3, 2021
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण बिबट्या त्याठिकाणावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी कुत्र्याला जिवंत बाहेर काढले. शौचालयामध्ये अडकलेल्या कुत्र्याला स्थानिक नागरिक 'बोलू' या नावाने हाक मारतात. दुपारी 2 वाजता म्हणजे तब्बल 7 तासांच्या प्रयत्नांनंतर बोलूची सुखरुप सुटका करण्यात आली.
भारतीय वनसेवा अधिकारी प्रविण कासवान यांनी या घटनेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही पोस्ट करताना त्यांनी असे लिहिले आहे की, 'प्रत्येक कुत्र्याचा एक दिवस असतो. कल्पना करा हा कुत्रा बरेच तास बिबट्यासोबत कैद राहून सुद्धा जिवंत बाहेर आला. हे फक्त भारतामध्येच होऊ शकते'
Every dog has a day. Imagine this dog got stuck in a toilet with a leopard for hours. And got out alive. It happens only in India. Via @prajwalmanipal pic.twitter.com/uWf1iIrlGZ
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) February 3, 2021
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर नेटिझन्सनी समिश्र प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी कमेंट्सच्या माध्यमातून वन्य भूमीवरील अतिक्रमणाबद्दल कसा विचार केला पाहिजे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही युजर्सने हा कुत्रा जिवंत कसा राहिला हे जाणून घेण्याबाबत उत्सुकता दाखवली. या फोटोवर एका युजरने 'या बिबट्याला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे!' अशी मजेशीर कमेंट केली आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीमध्ये प्रवेश करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बंगळुरुमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. एका निवासी इमारतीमध्ये बिबट्या घुसला होता. वन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव बिबट्याला जेरबंद केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Viral