नवी दिल्ली, 11 जानेवारी : हत्येच्या किंवा दुष्कृत्याच्या काही अशा घटना समोर येतात, ज्यामुळे ऐकणाऱ्यालाही धक्का बसतो. अशाच एका घटनेतील आरोपी बाबाला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. फतेहाबादच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने टोहानाच्या बहुचर्चित जलेबी बाबा सेक्स स्कँडल प्रकरणातील दोषी बिल्लुराम उर्फ अमरपुरीला शिक्षा सुनावली आहे.
न्यायालयाने बाबाला 14 वर्षे तुरुंगवास, 35 हजार दंड, 376C अंतर्गत 7-7 वर्षे तुरुंगवास, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत 14 वर्षे तुरुंगवास आणि 67 आयटी अॅक्टनुसार 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या या सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील. या शिक्षा सुनावताना न्यायालयाने बाबाची आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्ह्यामध्ये निर्दोष मुक्तता केली आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.
शिक्षा सुनावण्यात आलेल्या जलेबी बाबावर महिलांना चहामध्ये नशेच्या गोळ्या देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप होता. हा आरोपी बाबा त्या महिलांना ब्लॅकमेलही करायचा. बाबा अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याला न्यायालयाने 5 जानेवारी रोजी दोषी ठरवलं होतं. 6 जानेवारीला त्याच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला. त्यानंतर 9 जानेवारीला त्याच्या शिक्षेची घोषणा करण्याचं ठरवलं गेलं होतं. पण, 9 जानेवारी रोजी त्याच्या शिक्षेवरून गदारोळ झाला होता. मात्र 10 जानेवारी रोजी न्यायालयाने शिक्षेसंदर्भात निकाल दिला. यावेळी बाबा कोर्टात खूप रडत होता. तसेच न्यायाधीशांनी दया दाखवावी, अशी विनंतीही तो करत होता.
हे ही वाचा : सरकारी अधिकाऱ्याला कॉल गर्लचं प्रेम पडलं महागात, फोटो सोशल मीडियात व्हायरल
या आरोपी बाबाचे महिलांबरोबरचे 120 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ समोर आले होते. या प्रकरणात सहा पीडित महिलांनी बाबाच्या दुष्कर्माचे बळी ठरल्याचं कोर्टात सांगितलं आणि बाबाचं क्रूर कृत्य कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर तीन पीडितांच्या जबाबाच्या आधारे कोर्टाने बाबाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती.
जलेबी बाबाचं नेमकं प्रकरण काय?
टोहाना शहर पोलिसांनी 19 जुलै 2018 रोजी तत्कालीन स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून बाबा बालकनाथ डेराचे बाबा बिल्लुराम उर्फ अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याच्याविरुद्ध आयपीसीच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांना मोबाईलवर एका माहितीदाराने जलेबी बाबाचा अश्लील व्हिडिओ दाखवला होता. यानंतर पोलिसांनी त्याला पकडले असता त्याच्याजवळून 120 व्हिडिओ सापडले, ज्यामध्ये तो महिलांशी शारीरिक संबंध ठेवताना दिसत होता.
उपचाराच्या बहाण्याने खाऊ घालायचा नशेच्या गोळ्या
आरोपी जलेबी बाबाला अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितलं की, तो त्याच्याजवळ येणाऱ्या महिलांना आमिष दाखवून त्यांना नशेच्या गोळ्या खाऊ घालून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचा आणि मोबाईलवरून व्हिडिओ बनवायचा. नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा. अनेक महिलांकडून तो पैसे उकळायचा. बदनामीच्या भीतीमुळे महिला कोणाला या बाबाबद्दल काही सांगू शकत नव्हत्या. 13 ऑक्टोबर 2017 रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून शहर पोलीस टोहाना इथं त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 328, 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2018 मध्ये तत्कालीन एसएचओंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर घटनास्थळावरून चिमटे, राख, विभूती, नशेच्या गोळ्या, व्हीसीआर इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले होते.
पंजाबमधील एका मांत्रिकाच्या संपर्कात आला बाबा
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील रहिवासी असलेला अमरवीर सुमारे 20 वर्षांपूर्वी टोहानामध्ये आला होता. इथं आल्यानंतर त्याने टोहाना येथील नेहरू मार्केटमध्ये जिलेबीचा स्टॉल लावला. त्याचा जिलेबीचा धंदा चांगला चालल्यावर त्याने गजरेला बनवायला सुरुवात केली आणि धंदा वाढवला. दुकानाला 'अमरवीर के पंजाबी तोहफे' असं नावही त्याने दिलं होतं. त्याचा हा व्यवसाय 10 वर्षे चांगला चालला. याचदरम्यान त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्याला चार मुली आणि दोन मुलं आहेत. यादरम्यान पंजाबमधून एक मांत्रिक आला आणि त्याने अमरवीरला तांत्रिक विद्येविषयी माहिती दिली. यानंतर अमरवीर दोन वर्षे टोहाना येथून गायब झाला होता. नंतर तो टोहाना इथं परतला आणि वॉर्ड क्रमांक 19 मध्ये त्याने घर विकत घेतलं. तिथं त्याने बाबा बालकनाथ या नावाने मंदिर बांधले आणि त्यासोबत स्वतःचं घरही बांधले. मग तो मुलांसह तिथं राहू लागला.
हे ही वाचा : लग्नात पाहुण्या म्हणून आल्या आणि सर्वांसमोर पैसे घेऊन पळाल्या, घटना CCTV त कैद
अमरवीर झाला बाबा अमरपुरी
मंदिर बांधल्यानंतर अमरवीरने आपले नाव बदलून अमरपुरी ठेवले. तो लोकांचे दु:ख, त्रास दूर करतो, असा बोर्ड त्याने बाहेर लावला. त्याच्या तंत्र मंत्राची जादू सुरू झाली आणि लोकांची गर्दी जमू लागली. त्यानंतर बाबाकडे पैसाही येऊ लागला. याचदरम्यान त्याने पंजाबमध्ये मुलींसह 6 अपत्यांची लग्नं लावून दिली आणि त्याची सर्व मुलं पंजाबमध्येच राहू लागली. तंत्रविद्येच्या नावाखाली बाबाने महिलांशी अश्लील कृत्ये करण्यास सुरुवात केली आणि प्रकरण समोर आल्यानंतर त्याला अटक झाली. आता न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sex racket, Sexual harassment