मुंबई, 5 मे : मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं. एकीकडे ही गोष्ट खरी असली तरी दुसरीकडे मद्य शौकिनांची संख्या काही कमी नाही. अलीकडच्या काळात फॅशन म्हणून मद्यपान करण्याकडे कल वाढला आहे. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या समूहात दारूला उद्देशून काही ठरावीक संकेत निश्चित केलेले असतात. आपल्याकडे खंबा, अधा, पौवा आणि बच्चा असे विचित्र सांकेतिक शब्द मद्याच्या बाटल्यांना दिलेले आहेत. यावरून मद्याचं प्रमाण समजतं; मात्र आपल्या देशात मद्याच्या बाटलीत पूर्ण एक लिटर दारू कधीच नसते. या बाटलीत 750 मिलिलिटर मद्य असतं. यामागे काही विशेष कारणं आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या. मद्य शौकिनांमध्ये खंबा, अधा, पौवा आणि बच्चा अशी सांकेतिक नावं प्रचलित असतात. भारतीयांनी दारूच्या बाटल्यांना अशी विचित्र नावं दिलेली आहेत. यात खंबा म्हणजेच 750 मिलीची पूर्ण बाटली होय. 375 मिलीच्या अर्ध्या मद्य बाटलीला अधा असं म्हणतात. 180 मिलीच्या दारूच्या बाटलीला क्वार्टर किंवा पौवा तर 50 मिलीच्या मिनिएचरला काही ठिकाणी बच्चा म्हटलं जातं. Whisky आणि Whiskey मध्ये फरक काय? या दोन्ही दारु वेगळ्या असतात? खरं तर वेगवेगळ्या देशांत मद्याचं मोजमाप करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अमेरिकेसह जगातल्या इतर देशांत मद्याची बाटली पूर्ण एक लिटरची असते; मात्र भारतात मद्याची बाटली 750 मिलीची असते. यामागे काही कारणं आहेत. सुरुवातीच्या काळात मद्य बॅरल किंवा पिंपात साठवलं जात असे. 18व्या शतकात काचेचे दर पूर्वीपेक्षा स्वस्त झाले होते. प्रत्येक घरात काचेचे ग्लास असत. त्या वेळी दारू ठेवण्यासाठी काचेची बाटली सर्वोत्तम असल्याचं मान्य करण्यात आलं. त्या काळी बाटल्या तयार करण्यासाठी ग्लास ब्लोइंग तंत्राचा वापर केला जात असे. या तंत्रात पोकळ धातूच्या पाइपचा शेवटचा भाग उकळून तो ग्लासमध्ये घातला जात असे. गरम काच पाइपाभोवती गुंडाळल्यावर स्टीलच्या ताटावर फिरवून त्याला आकार दिला जात असे. यानंतर कारागीर पोकळ पाइप्सद्वारे काचेमध्ये हवा भरत असत. यामुळे बाटलीचा आकार वाढत असे. एखादी व्यक्ती क्षमतेनुसार बाटली पूर्ण श्वासात जास्तीत जास्त 750 मिलीपर्यंत फुगवायची. अशा परिस्थितीत, काचेच्या बाटलीसाठी 750 मिली हे स्टँडर्ड आकारमान मानले गेले. हे सर्व पूर्वी पर्यंत मानलं जात होतं. मात्र आता मशीनद्वारे बाटल्या तयार केल्या जातात. दारु जितकी जुनी तितकी चांगली, मग बिअरची एक्सपायरी डेट का असते? मद्य शौकिनांना मिनिएचरविषयी नक्कीच माहिती असेल. मद्याच्या या मिनिएचर बाटल्या विमानात सर्व्ह केल्या जातात. 5-स्टार हॉटेल्समधल्या रूममधल्या मिनी बारमध्ये मिनिएचर किंवा पाईंट बाटल्या असतात. मिनिएचर बाटल्या बहुधा महागड्या मद्याच्या असतात. जॉन पॉवर अँड सन्स या आयरिश व्हिस्की कंपनीने 1889मध्ये प्रथम मिनिएचर पॅक लाँच केले होते. महागड्या मद्याचा आस्वाद घेण्यासाठी मिनिएचर बाटल्या खरेदी केल्या जातात. सामान्यपणे या बाटल्या 50 मिलीच्या असतात. भारतात काही ठिकाणी या बाटल्या बच्चा या नावाने ओळखल्या जातात. या बाटल्या अनेकांना फॅशनेबल वाटतात. मद्याची पूर्ण बाटली 750 मिलीची असण्यामागे आणखी एक कारण आहे. हे कारण पेगशी संबंधित आहे. मद्याच्या पेगचा हिशोब ठेवण्यासाठी 750 मिली हे एक आदर्श प्रमाण समजलं जातं. मद्याच्या एका लहान पेगचा आकार 30 मिली, तर मोठ्या पेगचा आकार 60 मिलीचा असतो. बाटलीतल्या मद्याचं प्रमाणदेखील समान मोठ्या आणि लहान पेगच्या पटीत असतं. उदाहरणार्थ, 180 मिली मद्याचे तीन मोठे किंवा सहा लहान पेग बनवता येतात. त्याचप्रमाणे, मद्याच्या एका पूर्ण बाटलीतून (750 मिली) 12 मोठे आणि एक लहान पेग किंवा 25 लहान पेग तयार होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.