नवी दिल्ली 05 डिसेंबर : मानवानं आपल्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड प्रगती साधली आहे. मात्र, अजूनही निसर्गाच्या शक्तीपुढे मानवाची ताकद कमीच पडते. इंडोनेशियातील जनतेला नुकताच या गोष्टीचा अनुभव आला आहे. 4 डिसेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील सर्वांत उंच ज्वालामुखी, माउंट सेमेरूचा अचानक उद्रेक झाला आहे. 12 हजार फूट उंच पर्वताच्या माथ्यावरून तप्त लाव्हा, गरम राख आणि गरम वायू बाहेर पडत आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या खोऱ्यात वसलेल्या गावांमधील शेतांत लाव्हारसाच्या नद्या वाहत आहेत. ज्वालामुखीतून निघालेल्या गरम वायूमुळे पुलदेखील वितळ्याचं वृत्त आहे.
एकट्या इंडोनेशियामध्ये 121 सक्रिय ज्वालामुखी आहेत. माउंट सेमेरू हा ज्वालामुखी इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून 800 किलोमीटर आग्नेयेला जावा बेटावर आहे. जावामध्ये अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत. पण, माउंट सेमेरू हा सर्वांत धोकादायक आणि सर्वांत उंच ज्वालामुखी आहे. माउंट सेमेरू ज्वालामुखी अनेक दिवसांपासून हळूहळू धुमसत होता. मात्र, मान्सूनच्या पावसामुळे त्याचा लाव्हा डोम फुटला.
या वेळी स्फोटातून बाहेर पडणाऱ्या राख, गरम वायू आणि लाव्हाच्या नद्या डोंगरापासून आठ किलोमीटरपर्यंत खाली वाहत आल्या आहेत. सध्या ज्वालामुखीच्या धोक्याच्या क्षेत्रात सुमारे 3000 घरं आहेत. येथे राहणाऱ्या सर्व लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. ज्वालामुखीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत स्थानिक लोकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. तिथे सरकारकडून अन्न, पाणी आणि औषधं दिली जात आहेत.
पृथ्वीवर उभं राहून पृथ्वीला फिरताना कधी पाहिलंय; पाहा अद्भुत VIDEO
सेमेरू ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर सुमारे पाच हजार फूट उंचीवर राखेचे ढग आणि धुराचे लोट पसरले होते. लाव्हारसाचा प्रवाह खाली वाहत गेला आणि जवळच्या बेसुक कोबोकन नदीत उतरला. या घटनेनंतर लगेचच आजपासच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. यावेळी, ज्वालामुखीशी संबंधित धोक्याचा इशारा सर्वोच्च पातळीवर नेला आहे. म्हणजेच नागरिकांनी ज्वालामुखीजवळ जाऊ नये आणि अद्याप तिथे कोणी असेल तर त्यानं तत्काळ सुरक्षित ठिकाणी जावं, अशी सुचना देण्यात आली आहे.
इंडोनेशियाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे आजूबाजूची अनेक गावं झाकली गेली आहेत. धूर आणि राखेमुळे अंधार परसला आहे. नागरिकांना दिवसाही लाईटचा वापर करावा लागत आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
BREAKING: Indonesia’s Mount Semeru has explosively erupted, sending pyroclastic density currents — ‘avalanches’ of extremely hot gas and debris — screaming into several valleys. Quick thread (coming shortly): pic.twitter.com/pUKNcBBdP3
— Dr Robin George Andrews (@SquigglyVolcano) December 4, 2022
गेल्या वर्षीही सेमेरू पर्वतावर स्फोट झाला होता. त्यानंतर त्याचा लाव्हा, गरम वायू आणि राखेमुळे 51 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी 10 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होते.
पृथ्वीवर एकूण एक हजार 500 सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी 121 ज्वालामुखी इंडोनेशियात आहेत. म्हणजेच जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये आहेत. त्यापैकी 74 ज्वालामुखी इसवी सन 1800 पासून सक्रिय आहेत. 74पैकी 58 ज्वालामुखी 1950 पासून सतत सक्रिय आहेत. म्हणजेच त्यांचा कधीही स्फोट होऊ शकतो. 12 ऑगस्ट 2022 पासून, क्राकाटोआ, मेरापी, लेवोटोलोक, कारंगेतांग, सेमेरू, इबू आणि दुकोनो हे सात ज्वालामुखी सतत फुटत आहेत. केलुत आणि माउंट मेरापी यांना इंडोनेशियातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी मानलं जातं. हे दोन्ही ज्वालामुखी जावा प्रांतात आहेत.
इंडोनेशियामध्येच जास्त प्रमाणात सक्रिय ज्वालामुखी का आहेत? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. या प्रश्नाची तीन मोठी उत्तरं आहेत. इंडोनेशियापासून युरेशियन टेक्टॉनिक प्लेट दक्षिणेकडे, भारतीय-ऑस्ट्रेलियन टेक्टॉनिक प्लेट उत्तरेकडे आणि फिलिपिन्स प्लेट पश्चिमेकडे सरकत आहे. आता या तिन्ही प्लेट्समध्ये टक्कर किंवा घर्षण झाल्यामुळे इंडोनेशियात सतत ज्वालामुखी फुटतात.
इंडोनेशियाला ज्वालामुखीचा उद्रेक करणारा देश देखील म्हटलं जातं. हा देश 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर'वर वसलेला आहे. बहुतेक भौगोलिक आणि भूगर्भीय घडामोडी याच भागात होतात. त्यामुळे इंडोनिशियामध्ये सातत्यानं भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी उद्रेक अशा भौगोलिक घटना घडतात. या नैसर्गिक आपत्तींमुळे तिथे कधी-कधी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते.
मृत्यू तुम्हाला कसा शोधून काढेल याचा काही नेम नाही... हा Video पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल
इंडोनेशियातील बहुतेक ज्वालामुखी तीन हजार किलोमीटर लांबीच्या भौगोलिक साखळीवर स्थित आहेत. त्याला 'सुंदा आर्क' असं म्हणतात. येथे हिंदी महासागराचा सबडक्शन झोन आहे. म्हणजेच या ठिकाणी टेक्टॉनिक प्लेट्समुळे बहुतेक ज्वालामुखी जन्माला येतात. इंडोनेशियामध्ये 1815 मध्ये सर्वात भयंकर ज्वालामुखी उद्रेक झाला होता. तंबोरा पर्वतामध्ये हा उद्रेक झाला होता. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम थेट युरोपला देखील सोसावे लागले होते. इंडोनेशियातील ज्वालामुखीमुळे युरोपात अनेक वर्षे उन्हाळा ऋतू आला नव्हता. कारण, ज्वालामुखीतून निघणाऱ्या राखेनं वातावरण व्यापलं होतं. 90 हजार लोक मारले गेले होते. यातील 10 हजार नागरिकांना स्फोटाचा थेट फटका बसला होता. तर उरलेले 80 हजार नागरिक पीक नष्ट झाल्यानं आणि उपासमारीनं मरण पावले होते.
यानंतर, 1883 मध्ये क्राकाटोआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या स्फोटानं समुद्राला हादरे बसून त्सुनामी आली होती. या त्सुनामीत 36 हजार लोक मरण पावले होते. हा ज्वालामुखी ज्या बेटावर आहे त्या बेटाचा दोन तृतीयांश भाग खराब झाला होता. 2010 मध्ये झालेला माऊंट मेरापीचा उद्रेक देखील भयंकर होता. या उद्रेकातून निघालेला धूर आणि राख वातावरणात पोहोचली होती. सल्फर डायऑक्साइडचे ढग 12 ते 15 हजार मीटर म्हणजेच 12 ते 15 किलोमीटर उंचीवर पोहोचले होते.
इंडोनेशिया पाठोपाठ अमेरिकेमध्ये सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी आहे. अमेरिकेत 63 सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यानंतर, जपानमध्ये 62, रशियामध्ये 49 आणि चिलीमध्ये 34 सक्रिय ज्वालामुखी आहेत. म्हणजेच या सर्व ज्वालामुखी एकतर सतत धुमसत आहेत किंवा त्यांचा कधीही मोठा स्फोट होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indonesia, Shocking video viral