आंध्र प्रदेश, 24 नोव्हेंबर : येथील नेल्लोर जिल्ह्यातील प्रभाकर रेड्डी (Prabhakar Reddy) या व्यक्तीने एका मिनिटात तब्बल 68 सोड्याच्या काचेच्या बाटल्यांची झाकणे डोक्याने उघडत गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्याच्या या जागतिक विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (world record) नोंद करण्यात आली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये अनेक विक्रम नोंदवले जातात. त्यापैकी काही अगदीच जगावेगळे आणि एकमेवाद्वितीय असतात. गेल्या काही महिन्यांत भारतीयांनी असेच काही अनोखे विक्रम नोंदवले आहेत. केरळमधील एका व्यक्तीने जगातील सर्वाधिक लांबीचे पेन बनवले होते; तर अहमदाबादमधील अवघ्या सहा वर्षांचा मुलगा जगातील सर्वांत लहान वयाचा प्रोग्रॅमर ठरला. यात आता आणखी एका नव्या विक्रमाची भर पडली आहे, ती म्हणजे एका मिनिटांत डोक्याने सर्वाधिक काचेच्या बाटल्यांची झाकणं काढण्याच्या विक्रमाची. प्रभाकर रेड्डी असं या व्यक्तीचं नाव असून ते आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी अवघ्या एका मिनिटाच्या अवधीत तब्बल 68 काचेच्या बाटल्यांची झाकणे उडवली तीही डोक्याच्या सहाय्याने. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या कामगिरीचा व्हिडिओ पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, ‘डोन्ट ट्राय धिस अॅट होम’ म्हणजे घरी असा प्रयोग करू नका, असा इशारा देण्यात आला आहे.
DON'T TRY THIS AT HOME!
NEW RECORD: The most bottle caps removed with the head in one minute is 68 and was achieved by Prabhakar Reddy P, assisted by Sujith Kumar E and Rakesh B (all India) in Nellore, Andhra Pradesh, India. #GWRDaypic.twitter.com/u8CQR3cQUS
रेड्डी यांना सुजितकुमार ई आणि राकेश बी यांनी मदत केली. 18 नोव्हेंबर 2020 ला प्रभाकर रेड्डी यांनी पाकिस्तानमधील महम्मद रशीद यांनी 2016 मध्ये केलेला 61 बाटल्या उघडण्याचा विक्रम मोडला आणि नवीन 68 बाटल्यांचा विक्रम नोंदवला. प्रभाकर यांचा हा पहिलाच विक्रम नाही, याआधीही त्यांनी गिनीज बुकमध्ये विविध विक्रम नोंदवले आहेत. मे 2018 मध्ये त्यांनी एका मिनिटात 42 मार्शल आर्ट थ्रो करून सर्वाधिक मार्शल आर्ट थ्रो करण्याचा विक्रम नोंदवला होता, तर 2017 मध्ये एका मिनिटात हाताने सर्वाधिक अक्रोड फोडण्याचा विक्रम नोंदवला होता.
18 नोव्हेंबर हा दिवस गिनीज बुकचा वर्ल्ड रेकॉर्ड्स डे असतो. या दिवशी अनेक लोक नवीन विक्रम करून जुने विक्रम मोडण्याचा प्रयत्न करतात. हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच लोकप्रिय झाला असून, अनेकांनी रेड्डी यांचे अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. त्यांचा हा विक्रम तरुणाईला प्रेरणा देणारा आहे, असं एकाने म्हटलं आहे.