नवी दिल्ली 27 मार्च : अनेक लोक पत्नीचा वाढदिवस खूप खास पद्धतीने साजरा करतात. ते अनेक दिवस तयारी करतात. लाखो रुपये पाण्यासारखे खर्च करतात. जोडीदाराला खूश करण्यासाठी किंवा त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक त्यांना खास भेटवस्तू देखील देतात. जेणेकरून त्यांना चांगलं सरप्राईज मिळेल. एका व्यक्तीनेही असंच केलं. मात्र आता त्याला पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. याचं कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
व्यक्तीचं नाव जेसन स्कॉट आहे. अमेरिकेत राहणारे जेसन हे लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता, म्हणून त्यांने तिला एक नवीन आलिशान कार देऊन सरप्राईज देण्याचा विचार केला. अनेक शोरूम्सला भेट दिल्यानंतर त्यांनी अखेर 2021 मॉडेलची मासेराती एसयूव्ही बुक केली. यासाठी जेसनने $68,000 म्हणजेच जवळपास 56 लाख रुपये खर्च केले. गाडी घरी आली. बर्थडे पार्टी झाली. दोघेही आनंदाने जगत होते.
महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे चोरी होत नाही? बँकांनाही कुलूप नाही
फेब्रुवारीमध्ये त्यांची पत्नी मासेरातीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये कारची सर्व्हिस करून घेण्यासाठी गेली होती. तिथे मेकॅनिकने तपासणी केली असता कार, खिडक्या, दरवाजे यावरील व्हीआयएन जुळत नसल्याचं आढळून आलं. चौकशी केली असता ही कार चोरीची असल्याचं निष्पन्न झालं. 2017 मध्येच ती चोरी झाली होती.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हीआयएन नंबर म्हणजे काय? जेव्हा जेव्हा वाहन बनवलं जातं तेव्हा त्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. हा क्रमांक गाडी बनवताना त्यावर छापलेला असतो. याला VIN क्रमांक म्हणतात, ज्याचा संपूर्ण अर्थ वाहन ओळख क्रमांक असा होतो. त्यात कोणता खंड, देश, वाहन निर्माता, इंजिन कोड, ट्रान्समिशन कोड, कार कोणत्या वर्षी बनवली, कोणत्या प्लांटमध्ये, कोणत्या महिन्यात बनवली गेली याची माहिती असते.
सर्व्हिस सेंटरने पोलिसांना कळवलं आणि कार जप्त करण्यात आली. स्कॉटची देखील चौकशी करण्यात आली होती परंतु त्याने कारवानाकडून कार खरेदी केल्याचा पुरावा दिल्यावर त्याला सोडून देण्यात आलं. स्कॉट आता कार डीलरकडून $1 दशलक्ष भरपाई मागत आहे. दुसरीकडे, तुम्ही वाहन आणल्याशिवाय आम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही, असे डीलर सांगत आहेत. स्कॉटकडे आता कारही नाही आणि त्याला दर महिन्याला ईएमआयही भरावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wife