मुंबई 22 जानेवारी : मानवी शरीर हे जगातील सर्वात गुंतागुंतीची रचना मानली जाते. त्यामध्ये कधी काय बदल आणि बिघाड होतील, याची शाश्वती नसते. त्यामुळे शास्त्रज्ञ सतत शरीराबद्दलच्या विविध संशोधनांमध्ये व्यग्र असतात. या संशोधनांमधून विविध मानवी अवयवांबद्दल नवीन नवीन माहिती समोर येते. मानवी हाताचा विचार केल्यास, सस्तन प्राण्यांच्या विविध जातींपैकी (प्रायमॅट्स) मानवाचा हात लक्षणीयरित्या वेगळा आहे. लहान बोटं, लहान तळहात आणि मजबूत अंगठ्यामुळे मानवी हात वेगळा वाटतो.
आपल्या हातांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या हाताचा अंगठा एकाच हाताच्या प्रत्येक बोटाच्या सहज संपर्कात येतो. आपल्या हातांच्या उत्क्रांतीस कारणीभूत असलेले सर्व घटक आपण पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. मात्र, अंगठ्याची इतर बोटांच्या एकदम समोर येण्याची क्षमता आणि बोटांचे विविध फायदे यांना अनुसरून आपल्या प्रत्येक बोटाची लांबी निर्धारित झालेली आहे. 'गिझमोडो डॉट कॉम'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही पाहा : भिंतीवर लघवी करुन दाखवाच, 'या' शहरातील सरकानं लढवली अजब शक्कल
सध्याचा, म्हणजेच आधुनिक मानवाचा हात कधी अस्तित्वात आला याबाबत खात्री नाही. पण अलीकडील शोधापूर्वी सुमारे 800,000 वर्षांपूर्वी मानवी हात अस्तित्वात आला असावा याबाबत एकमत होते. मात्र, 1.4 दशलक्ष वर्षांपूर्वीचा स्टायलॉइड (टोकदार भाग) असलेला तिसरा मेटाकार्पल (बोटे व मनगट यांना जोडणार्या हाताच्या पाच अस्थींपैकी एक भाग) सापडल्यानंतर, शास्त्रज्ञ आता विचार करू लागले आहेत की आधुनिक मानवी हात त्या पूर्वी विकसित झाला असावा.
लाखो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांचे हात आधुनिक चिंपांझींसारखे होते. ज्यांचे हात, तळवे आणि बोटं जास्त लांब आहेत. अंगठे खूपच लहान आणि कमकुवत आहेत. हातांवर चालणं आणि झाडांवर चढण्याच्या क्रिया करण्यासाठी विकसित झालेली, त्यांची बोटं वळलेली आहेत.
मानवी बोटांच्या टोकांप्रमाणे, त्यांच्या बोटांना आधार देण्यासाठी अत्यंत संवेदनशील रुंद हाडं (अपिकल टफ्ट्स) नसतात.
एकंदरीत, यामुळे जो हात तयार होतो तो क्षितीज समांतर पातळीवरील (उदा. झाडाच्या फांद्या) वस्तू धरण्यासाठी योग्य असतो. पण, झाडाची हालणारी फांदी सोडवताना त्याची पकड सहजपणे नाहीशी होऊ शकते. एखादी गोष्ट चिमटीत घेताना चिंपांझिंच्या बोटांमध्ये ताकद आणि अचूकता कमी असते.
असं खराब-ग्रिपिंग आणि अस्ताव्यस्त पंजाच्या तुलनेत, आपल्या हातांचे तळवे आणि बोटं खूपच लहान आहेत. पण, आपल्या बोटांच्या टोकांना मजबूत आधार देणारी हाडं असतात. ज्याच्या वर रुंद, संवेदनशील, फॅटी पॅड असतात जे असमान पृष्ठभागाच्या वस्तू सहज सामावून घेऊ शकतात.
आपल्या तळहातामध्ये फॅटी पॅडदेखील जोडले गेले आहेत. ज्यापैकी काही हातांना संरक्षण देतात आणि पकडण्याच्या क्षमतेला मदत करतात.
अधिक ताण सहन करण्यासाठी अंगठ्याचा, तर्जनीचा आणि मध्यमेचा तळ मजबूत आहे. आपल्या अंगठा इतर बोटांशी, फ्लेक्सॉर पोलिसिस लाँगस, फ्लेक्सॉर पोलिसिस ब्रेव्हिस आणि फर्स्ट व्हॉलर इंटरोसियस या तीन स्नायूंनी जोडलेला आहे. यामुळे आपल्या अंगठ्याला आणि एकत्रितपणे संपूर्ण हाताला लक्षणीयरित्या बळ मिळतं. हे घटक चिंपांझीमध्ये दिसत नाहीत.
मानवी हाताच्या रचनेमध्ये असे बदल का घडले, हे स्पष्ट करण्यासाठी संशोधकांनी अनेक सिद्धांतांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी सर्वात लोकप्रिय सिद्धांत म्हणजे, एक चांगली, मजबूत, बारीक पकड चांगली साधनं बनवण्यासाठी आवश्यक होती. ज्यांच्याकडे (मानव) अशी पकड होती त्यांना एक वेगळा फायदा झाला आणि इतर प्रायमॅट्सपेक्षा ते वेगळे ठरले. याच हातांचा वापर करून सुमारे 3.4 दशलक्ष वर्षांपूर्वी मानवानं दगडी उपकरणं हाताळली आहेत आणि सुमारे 1.7 दशलक्ष वर्षांपूर्वी कुऱ्हाडी व क्लीव्हर यांसारखी अधिक सुबक हत्यारं घडवली आहेत.
पुढील लाखो वर्षांमध्ये ही साधनं अधिक चांगली होत गेली आणि मानवी हाताची रचना देखील विकसित झाली. असं मानलं जातं की, अधिक चांगली साधनं बनवण्यासाठी आणि ती वापरण्यासाठी हाताची ताकद आणि कौशल्यं आवश्यक असतं. त्यामुळेच हाताची उत्क्रांती झाली.
आणखी एका सिद्धांतानुसार, अचूकपणे फेकण्याची क्रिया आणि एखादी वस्तू पकडण्याची क्रिया यांमुळे मानवी हात विकसित झाले. या गृहितकाच्या समर्थनासाठी शास्त्रज्ञ या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधतात की, मानवी हाताच्या पकडण्याच्या क्रियेमध्ये दोन मुख्य घटकांचा समावेश आहे. वस्तू अचूकपणे पकडणं आणि सामर्थ्यानं पकडणं, असे हे दोन घटक आहेत.
पिचर ज्या प्रकारे बेसबॉल धरतो, हे हाताच्या अचूक पकडीचं कदाचित सर्वोत्तम उदाहरण ठरू शकतं. तर, हातात कुऱ्हाड धरण्याची क्रिया ही पॉवर ग्रिफचं चांगलं उदाहण ठरू शकतं. या सिद्धांतावर विश्वास असणाऱ्यांच्या मते, विकसित, लांब आणि विरोधाभासी अंगठ्याचा समावेश असलेल्या मानवी हातांच्या तुलनेत, बोटांच्या टोकांवर अचूक नियंत्रण नसलेले इतर प्रायमेट्स जास्त ताकदीनं किंवा अचूकतेनं एखादी वस्तू फेकू शकत नाहीत. अगदी याच प्रमाणं, मानवाच्या तुलनेत इतर प्रायमेट्स एखादी वस्तू ताकदीनं धरू शकत नाही.
तिसरा सिद्धांत हा काहीसा हिंसक आहे. हा सिद्धांत पहिल्या दोन्ही सिद्धांतांतील घटकांना संभाव्य योगदान देणारे घटक म्हणून मान्यता देतो. पण, मानवी हाताची उत्क्रांती मजबूत मुठीची रचना व्हावी यासाठी झाली आहे, असं हा तिसरा सिद्धांत सांगतो. हा सिद्धांत मानणाऱ्यांच्या मते, हाता मुठ तयार झाल्यानंतर मानवी हात खरोखर एक मजबूत शस्त्र बनतो.
या सिद्धांताच्या समर्थनासाठी अनेक उदाहरणं देता येतील. चिंपांझी मानवाप्रमाणं हाताची चांगली मुठ बनवू शकत नाहीत, लहान तळव्यामुळे मानवी मुठ अधिक शक्तीनं आघात करू शकतो आणि मूठ केल्यानंतर ज्या प्रकारे हाडांची मांडणी होते ती पीडित व्यक्तीवर अधिक परिणामकारक ठरते.
आपल्या हाताच्या हाडांची रचना बघितल्यास संशोधकांच्या या युक्तिवादाला अधिक बळ मिळतं. जेव्हा आपण मुठ तयार करतो तेव्हा बोटांच्या आकारमुळे मुठीमध्ये पोकळ जागा राहत नाही. याव्यतिरिक्त, अंगठ्याकडून इतर बोटांना मिळालेला मजबूत आधार देखील चांगली मूठ तयार होण्यास कारणीभूत ठरतो.
एकूणच काय तर आपल्या हाताच्या बोटांची रचना ही आणि विकास विविध सिद्धांतांवर आधारित आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Medical, Science, Social media, Top trending, Viral