मुंबई, 23 जुलै : जगभरात हजारो वर्षांपासून वस्तूंची देवाण-घेवाण करून व्यवहार चालत होते. त्याला वस्तू-विनिमय पद्धती म्हणतात, म्हणजे मी माझ्या शेतातले एक पोतं गहू जर एखाद्या व्यक्तीला दिले तर तो त्याबदल्यात माझ्या बैलगाडीचं लाकडाचं चाक तयार करून द्यायचा. ही झाली वस्तू विनिमय पद्धत. हळूहळू ही पद्धती बदलली आणि वस्तुंऐवजी धातुच्या नाण्यांची देवाण-घेवाण सुरू झाली. नंतरच्या काळात कागदाच्या नोटा आल्या. या नोटांना चलनी नोटा (Currency notes) किंवा नाण्यांना चलनी नाणी म्हणतात. हे सगळं सांगण्याचं कारण असं की, आता ही पद्धत आपल्याला इतकी सवयीची झाली आहे की त्याबद्दल आपण फारसा विचारच करत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या नोटा तयार कशा होतात? या प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ आम्हाला मिळाला आहे. यात युरोपातील युरोपियन सेंट्रल बँकेत (European Central Bank) कागद तयार करण्यापासून ती प्रत्यक्ष चलनी नोटेत म्हणजे तिथल्या युरोंमध्ये रुपांतरित होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यानंतर, तुमच्या नोट छपाईबद्दलच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन होईल.
काय दाखवलंय व्हिडिओत?
युरोपियन सेंट्रल बँकेतील युरो छपाईचा हा व्हिडिओ असून त्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून कागद कसा तयार होतो. त्याच्या शीट्स (Sheets of paper) कशा तयार केल्या जातात. त्या शीट्सवर युरोवरील चित्र आणि मजकूराची छपाई कशी होते, त्यात वॉटरमार्क (Water mark) कसा वापरला जातो आणि अंतिमत: शीट्स कापून त्यापासून युरो कसे तयार होतात हे सगळं तुम्हाला पहायला मिळतं.
भारतात कुठे छापल्या जातात चलनी नोटा?
महाराष्ट्रातलं नाशिक (Nasik), मध्य प्रदेशातलं देवास (Devas), कर्नाटकमधलं म्हैसूर (Mysore) आणि पश्चिम बंगालमधलं सालबोनी (Salboni) या चार ठिकाणी भारतातील चलनी नोटांचे सरकारी छापखाने आहेत. नाशिक आणि देवासमधल्या प्रेस ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेअंतर्गत काम करते. भारतीय रिझिर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) सब्सिडरी कंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत म्हैसूर आणि सालबोनीचा छापखाना काम करतो.
आरबीआयची स्थापना
भारतातील चलनी नोटा छापणं आणि त्यांसंबंधी आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India) स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात बँकेने 10 हजार रुपयांची नोटही छापली होती पण स्वातंत्र्यानंतर ती बंद करण्यात आली. आरबीआयने 1938 मध्ये पहिलांदा कागदी चलनी नोटा छापल्या. ही नोट होती पाच रुपयांची (Five Rupee Note) आणि त्यावर चित्र होतं ब्रिटनच्या किंग जॉर्ज- सहावे यांचं. भारतात पहिल्यांदा 30 नोव्हेंबर 1917 ला एक रुपयांची नोट छापण्यात आली. पहिल्या जागतिक युद्धात नाण्यांची अडचण निर्माण झाल्यामुळे ही कागदी चलनी नोट छापली होती त्यावर चित्र होतं जॉर्ज पंचम यांचं.
जगात या चार ठिकाणी तयार होतो नोटांचा कागद
चलनी नोटांचा कागद (Paper for Currency Notes) इतर कागदापेक्षा वेगळा असतो. त्यामुळे तो तयारही विशिष्ट ठिकाणीच केला जातो. चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद जगात फक्त चार ठिकाणी मिळतो आणि विशेष मशीन वापरून या कागदाचं रूपांतर चलनी नोटांसाठीच्या खास कागदात केलं जातं.
चलनी नोटांचा कागद तयार होणारी ही आहेत चार ठिकणं
1. फ्रान्समधील आर्गो विगिज
2. अमेरिकेतील पोर्टल
3. स्वीडनमधील गेन
4. पेपर फ्रॅब्रिक्स ल्यूसेंटल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.