जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हडप्पा संस्कृतीपासून मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास; भारतात उत्खननादरम्यान सापडले महत्त्वपूर्ण पुरावे

हडप्पा संस्कृतीपासून मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास; भारतात उत्खननादरम्यान सापडले महत्त्वपूर्ण पुरावे

हडप्पा संस्कृतीपासून मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास; भारतात उत्खननादरम्यान सापडले महत्त्वपूर्ण पुरावे

चांगला पौष्टिक आहार म्हणून अनेक धान्यांच्या पिठाचे म्हणजेच मल्टिग्रेन लाडू (Multigrain Laddoos) खाण्याची पद्धत अलीकडे मोठ्या प्रमाणावर दिसते. मात्र मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास थोडा थोडका नव्हे तर तब्बल चार हजार वर्षं जुना आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    चांगला पौष्टिक आहार म्हणून अनेक धान्यांच्या पिठाचे म्हणजेच मल्टिग्रेन लाडू (Multigrain Laddoos) खाण्याची पद्धत अलीकडे मोठ्या प्रमाणावर दिसते. मात्र मल्टिग्रेन लाडूंचा इतिहास थोडा थोडका नव्हे तर तब्बल चार हजार वर्षं जुना आहे. हडप्पा संस्कृतीत (Harappan Culture) राहणारी माणसंही उच्च प्रथिनमूल्य असलेले मल्टिग्रेन लाडू खात होते, असं एका अभ्यासातून आढळलं आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) सुरू असलेल्या उत्खननादरम्यान (Excavation) सापडलेल्या घटकांच्या अभ्यासाअंती ही बाब स्पष्ट झाली आहे. लखनऊमधली बिरबलसाहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओसायन्सेस (BSIP)आणि नवी दिल्लीतील आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) या संस्थांनी संयुक्तरित्या हा अभ्यास केला होता. या अभ्यासाबद्दलचा लेख एल्सेव्हियरच्या’जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्स : रिपोर्टस्’मध्ये अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. पाकिस्तानच्यासीमेजवळ राजस्थानच्या पश्चिमेकडील भागातल्या अनुपगड जिल्ह्यात बिजनोर(Bijnor)इथे हडप्पा संस्कृतीच्या उत्खनन स्थळावर 2014 ते 2017 या कालावधीत उत्खनन सुरू होतं. त्यादरम्यान 2017 मध्ये किमान सात लाडू सापडले आहेत. ‘तिथे सुरू असलेल्या उत्खननावेळी एएसआयला एकाच आकाराचे आणि राखाडी रंगाचे सातमोठे लाडू, बैलांच्या दोन मूर्ती (Bull Figurines) आणि हातात धरता येण्यासारखं तांब्याचं कुऱ्हाडीसारखं शस्त्र या गोष्टी सापडल्या,‘असं BSIP चे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेश अग्निहोत्री यांनी सांगितलं. ‘केलेल्या अभ्यासातून असं स्पष्ट झालं, की हे लाडू ख्रिस्तपूर्व 2600 वर्षांपूर्वीचे आहेत. त्या लाडवांवर एका कठीण बांधकामाचा भाग पडला होता. त्यामुळे त्याखाली हे लाडू सुरक्षित राहिले. ते लाडू फुटले असते, तर कुजून गेले असते. मात्र ते चिखलात असल्याने आतलं सेंद्रिय द्रव्य आणि अन्य हरित घटक संरक्षित राहिले,‘असंही त्यांनी सांगितलं. ‘या लाडवांबद्दलची सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की जेव्हा त्यांचा पाण्याशी संपर्क आला तेव्हा ते द्रावण जांभळ्या रंगाचं झालं. एएसआयने हे लाडवांचे नमुने शास्त्रीय विश्लेषणासाठी बीएसआयपीकडे दिले,‘असंही त्यांनी सांगितलं. ‘पूर्वीच्या सरस्वती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आताच्या काळात घग्गर (Ghaggar)असं नाव असलेल्या नदीच्या खोऱ्यात केलेल्या उत्खननात सापडलेल्या या लाडवांचा दैवी किंवा प्रचंड शक्ती असलेल्या घटकांच्या उपासनेशी काही तरी संबंध असावा असं आम्हाला वाटलं. कारण त्या ठिकाणाच्या जवळच बैलांच्या छोट्या मूर्ती आणि कुऱ्हाडीसारखं शस्त्र सापडलं. त्यांच्या आकारावरून हे निश्चित आहे, की त्यावस्तू मानवनिर्मितच आहेत. त्यामुळे आमचं कुतूहल जागृत झालं आणि त्यांचे घटक काय असतील हे शोधायचं आम्ही ठरवलं,‘असं अग्निहोत्री यांनी सांगितलं. हे ही वाचा- Explainer : लष्करी हुकूमशाहीला कसं घाबरवतंय महिलांचं पारंपरिक वस्त्र? ‘सुरुवातीला आमचा असा अंदाज होता, की हे मांसाहारी खाद्य असेल; पण सूक्ष्मदर्शकाखाली केलेल्या प्राथमिक तपासणीनंतर असं आढळलं, की बार्ली, गहू, वाटाणा आणि काही तेलबियांपासून हे लाडू तयार करण्यात आले होते. बीएसआयपीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अंजुम फारुकी यांनी हे विश्लेषण केलं. सिंधू संस्कृतीच्या पूर्वार्धातले बहुतांश लोक शेतकरी होते. त्यामुळे या लाडवांचे घटक प्रामुख्याने शाकाहारी आणि उच्च प्रथिनांनी युक्त असावेत, असा त्याचा अर्थ निघतो,‘असंही अग्निहोत्री यांनी स्पष्ट केलं. अधिक विश्लेषणानंतर त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम असल्याचं दिसल्यामुळे त्या लाडवांमध्ये डाळी, स्टार्च आणि प्रथिनं असल्याचं सिद्ध झालं.‘लाडवांमध्ये तृणधान्ये आणि डाळी होत्या. तसंच मूग डाळीचं प्रमाण सर्वाधिक होतं,‘असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. लखनऊमधली नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि बीएसआयपी या संस्थांमध्ये या लाडवांचं संपूर्ण सेंद्रिय भू-रासायनिक विश्लेषण करण्यात आलं. त्यातून ही बाब स्पष्ट झाली. दोन संस्थांमधले नऊ शास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वज्ञांच्या चमूने या सगळ्यातून अंतिम निष्कर्ष असा काढला, की हडप्पा संस्कृतीतले लोक कोणत्या तरी शक्तीची उपासना करत होते. त्या शक्तीला काही तरी सादर करत होते. प्रथा पाळत होते आणि तातडीने पोषण मिळण्याचा स्रोत म्हणून मल्टिग्रेन लाडूही त्यांच्या आहारात असत. बैलांच्या मूर्ती आणि हत्यारांच्या अस्तित्वावरून त्याकाळचे लोक या घटकांच्या उपयोगितेमुळे त्यांचा बराच आदर करत होते, असंही त्यातून कळतं. ‘लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अन्नधान्याच्या प्रकारांवरून हडप्पा काळातल्या शेती पद्धतीची कल्पना येते. हा शोध नवा असून भारताच्या वैभवशाली इतिहासातल्या अजूनही दडलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकायला नव्या संशोधनाला यातून चालना मिळेल,‘असा विश्वासही अग्निहोत्री यांनी व्यक्त केला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात