नवी दिल्ली, 17 डिसेंबर : दोन व्यक्तींमध्ये जसे मित्रत्वाचे संबंध असतात, तसे अनेकदा तुम्ही दोन प्राण्यांमध्येही पाहिलं असतील. दोन प्राण्यांमध्ये सुरू असलेल्या मस्तीचे व्हिडिओही तुमच्या पाहण्यात आले असतील. काही वेळा प्राणी इतके अनपेक्षित वर्तन करतात, की ते प्राणी आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, जे फक्त मनोरंजनच करत नाहीत, तर त्यातले प्राणी माणुसकीचा आणि मैत्रीचा धडा देतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक मांजर आणि रेनडिअरची मैत्री पाहायला मिळतेय. वाइल्डलाइफ व्हायरल सीरिजमध्ये इन्स्टाग्रामवरच्या animal_lover_534 या अकाउंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेनडिअर आणि मांजर यांचा एक व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटेल. खरं तर, हे प्राणी एकत्र पाहायला मिळणं दुर्मीळ आहे; पण हे दोन प्राणी केवळ एकत्र आले नाहीत, तर त्यांनी थोडा वेळ मस्तीही केली. या व्हिडिओला जवळपास 30 लाख लाइक्स मिळाले आहेत. मांजर-रेनडिअरची मैत्री अनेकांना आवडली - सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक रेनडिअर दिसतोय. त्याच्या जवळ एक काळं मांजर बसलं आहे. हा रेनडिअर घराच्या मागच्या अंगणात चरत असून त्याला पाहताच मांजर त्याच्याजवळ गेलं. रेनडिअरची भीतिदायक आणि तीक्ष्ण शिंगं पाहून ते बिचारं घाबरून त्याच्यासमोर बसलं. थोड्या वेळाने रेनडिअरची नजर घाबरून बसलेल्या मांजराकडे गेली. त्याने काही क्षण गवत खाणं थांबवलं आणि मांजराकडे लक्ष दिलं. हे वाचा - अनोखा विश्वविक्रम : एकाच वेळी ९ मुलांना दिला जन्म; वर्षभरानंतर आईसह बाळं सुखरुप म्हणून व्हिडिओची आहे चर्चा स्वतःकडे दुसऱ्यांनी लक्ष द्यावं, असं मांजरांना नैसर्गिकरीत्या वाटत असतं. त्यामुळे मांजर सातत्यानं असा प्रयत्न करतं, की जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे जाईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं दिसत आहे.
सुरुवातीला मांजर शांतपणे रेनडिअरला बसून पाहत होतं; मात्र काही वेळाने त्याला त्याने पंजा मारला. त्यानंतर रेनडिअरने मांजराकडे पाहिलं. काही काळ त्याने त्याच्यासोबत मस्ती केली आणि शेवटी त्यानेही मांजराला लाथ मारली. हा व्हिडिओ अनेकांना आवडला असून त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. बहुतांश जणांनी या व्हिडिओवर ‘ब्युटीफुल’ अशी कमेंट केली आहे. हे वाचा - माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल सोशल मीडियावर जंगलातल्या प्राण्यांसंबंधीचे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत असते. तसंच हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही केले जातात. अनेक जण त्यावर मजेशीर कमेंट्सही करतात. त्यामुळेच सध्या वाइल्डलाइफशी संबंधित व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चलती आहे.