मुंबई, 15 डिसेंबर : मातृत्व ही आनंदाची जबाबदारी असते. काही वेळा मुलं जुळी किंवा तिळी असतात, तेव्हा ही जबाबदारी वाढते; मात्र एकाच वेळी 9 मुलं जन्माला आली तर? ही कल्पना नसून प्रत्यक्षात एका महिलेनं 9 मुलांना जन्म दिला आहे. त्यांना नोनूप्लेट्स असं म्हणतात. याआधीही एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र विशेष गोष्ट अशी की या वेळी ती सगळी 9 बाळं सुखरुप आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम आफ्रिकन देशांपैकी माली या देशात 26 वर्षांच्या हलीमा सिसे या महिलेनं वर्षभरापूर्वी एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला; मात्र अशा प्रकारे 9 मुलांचा जन्म झाला, तर त्या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. याआधीच्या अशा घटनांमध्ये सर्वच्या सर्व मुलं जगू शकली नव्हती. त्यामुळेच हलिमाच्या बाबतीत हा जागतिक विक्रम बनला आहे. गिनीज बुकमध्ये याची नोंद करण्यात आलीय. वर्षभर मुलांची व आईची व्यवस्थित काळजी घेतल्यानंतर आता ते सगळे घरी परतले आहेत. मुलांची तब्येत एक वर्षानंतरही व्यवस्थित असून ही खूप अभिमानाची गोष्ट असल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा :
माणसाला जिवंत गिळताना दिसला अवाढव्य अजगर; VIDEO पाहूनच अंगाचं पाणी पाणी होईल
माली देशाच्या उत्तरेकडच्या तिंबक्तूटू या शहरात राहणारी हलिमा सिसे आणि तिचे 35 वर्षीय पती कादेर आर्बे 9 मुलांच्या आगमनानं खूश आहेत. हलिमाने 5 मे 2021 ला कॅसाब्लांका इथे 5 मुली आणि 4 मुलांना जन्म दिला. “गेल्या वर्षी मोरोक्कोमध्ये 9 मुलांना जन्म देणारी आई आता घरी परत आली आहे. त्या सर्वांची प्रकृती ठीक असल्याचं पाहून आम्हाला आनंद होतो आहे. ते सर्व सुखरूपपणे मालीला पोहोचले आहेत,” असं मालीचे आरोग्यमंत्री दिमिनाटो सांगारे यांनी म्हटलंय. त्या 9 मुलांसह आई-वडिलांचं स्वागत करतानाचा एक फोटो दिमिनाटो यांनी फेसबुकवर शेअर केला. हलिमा 25 आठवड्यांची गरोदर असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे 30 आठवड्यांपर्य़ंत तिची काळजी घेण्यात आली. त्यानंतर सिझेरियन प्रसुती करण्यात आली. त्यासाठी 10 डॉक्टर आणि 25 पॅरामेडिक उपस्थित होते. सगळ्या मुलांचं वजन अर्धा ते एक किलो होतं. त्यामुळे त्यांना विशेष दक्षता कक्षात ठेवण्यात आलं. एकाच वेळी 9 मुलांना सुरक्षितरीत्या जन्म देण्याचा हा पहिलाच विश्वविक्रम आहे. याआधी 8 मुलांना जन्म दिल्याचा विश्वविक्रम होता. अमेरिकेतल्या 33 वर्षीय ‘ऑक्टोमम’ नाड्या सुलेमान हिनं 2009मध्ये 8 मुलांना जन्म दिला होता.
हेही वाचा : आठ वर्षीय मुलीचं सांताक्लॉजला पत्र, चिमुकलीने आई-वडिलांसाठी मागितलं ‘हे’ गिफ्ट
ऑस्ट्रिलायात 1971मध्ये पहिल्यांदा 9 मुलांना एकाच वेळी जन्म देण्याची घटना घडली होती; मात्र जन्मल्यानंतर एकाच आठवड्यात सर्व 9 बाळांचा मृत्यू झाला. मलेशियात 1999मध्ये दुसऱ्यांदा अशी घटना घडली. तेव्हाही मुलं जगू शकली नाहीत. प्रसूतीनंतर लगेचच ती दगावली. हलिमालाही प्रसुतीवेळी अडचणी आल्या होत्या; मात्र ती आणि तिची 9 मुलं जन्माच्या वर्षभरानंतरही सुखरूप आहेत. यामुळे विश्वविक्रम म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.