सध्याच्या काळात कोरोनापासून (corona) बचावासाठी लसीकरण(vaccination) हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. लोकांना लस घेण्यासाठी जागरुक करण्यासाठी सरकारकडून विविध अभियानं राबवली जात आहेत. सोशल मीडियासह बरेच डेटिंग अॅप्सही (dating apps) ‘व्हॅक्सिनेटेड’चे बॅज युझर्सना देत आहेत. नुकतीच एका मॅरेज मेट्रोमोनियल साईटवरील एका मुलीची अॅड व्हायरल झाली आहे. या अॅडमध्ये तिने लग्नासाठी लसीकरणाची अट ठेवली आहे. याबाबत टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.
या अॅडमध्ये मुलीनं लिहिलंय की, तिने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून तिला असा मुलगा पाहिजे ज्याला कोरोनाची कोणतीच लक्षणं नसेल आणि त्याने कोरोनाच्या कोव्हिशिल्ड (covishield) लसीचे दोन्ही डोस घेतले असतील. वृत्तपत्रातील ही जाहीरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून अनेक नेटकऱ्यांनी ही जाहीरात शेअर केली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही ही अॅड ट्विटरवर शेअर केली आहे. तसेच त्यांनी कॅप्शन दिलंय, की ‘लग्नाचं गिफ्ट एक बूस्टर शॉट असेल यात शंका नाही. काय हेच आपल्यासाठी न्यू नॉर्मल असेल?’
हे ही वाचा-कोरोनावर नियंत्रण कसं मिळवायचं? देशाची राजधानी दिल्ली मुंबईकडून घेणार धडे
काय आहे या व्हायरल अॅडमागील सत्य?
दरम्यान, ही अॅड व्हायरल झाल्यानंतर बऱ्याच जणांनी ही अॅड खरी आहे की खोटी याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, ही अॅड गोव्यातील एल्डोना येथील एका व्यक्तिनं सुरू केलेलं हार्मलेस अभियान होतं. लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्याने हे अभियान सुरू केलं होतं. ही अॅड फार्मासिस्ट असलेल्या साव्हिओ फिगुएरेडो यांनी तयार केली असून गेल्या आठवड्यात फेसबूकवर शेअर केली होती. त्यांच्या मूळ पोस्टमध्ये जी जाहीरात आहे, त्यामध्ये लग्नाच्या अटीसह लसीकरणाबाबत बरीच माहिती दिली आहे. ‘द फ्यूचर ऑफ मॅट्रिमोनियल्स’ या नावाखाली त्यांनी ही अॅड दिली. तसेच त्यामध्ये त्यांनी एका लसीकरण केंद्राचा फोन नंबर टाकून शेअर केली आहे. या अॅडमध्ये लसीच्या दुसरा डोस घेण्यासाठी तारीख देखील दिली होती.
काय म्हणाले फिगुएरेडो –
ही पोस्ट तयार करणारे सेव्हियो फिगुएरेडो म्हणाले की, ‘मी लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही अॅड तयार केली आणि फेसबूक पेजवर पोस्ट केली आहे. लोकांना ही अॅड खरी वाटली आणि व्हायरल केली. या अॅडनंतर कोलकत्ता, ओडिशा आणि मंगळुरूहून लग्नासाठी फोन आलेत. मी ही अॅड व्हायरल करण्यासाठी बनवली नव्हती, ती केवळ माझ्याच फ्रेंडलिस्टसाठी होती. मात्र, ही अॅड व्हायरल झाल्याचा मला आनंद झाला आहे, ही अॅड वाचून 10 जरी लोकांनी लस घेतली तरी मला चांगलं वाटेल,’ असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Shashi tharoor