मुंबई, 15 जून : 2016 मध्ये सोनाक्षी सिन्हाचा ‘अकिरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. महाविद्यालयीन तरुणांचा ग्रुप तिला प्रचंड त्रास देतो आणि ती एकटीच सर्वांवर तुटून पडते. आजही तो अॅक्शन सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. या सीनची पुन्हा आठवण होण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे. यात एकट्या तरुणीला चारही बाजूंनी घेरून तिची छेड काढणाऱ्या 6 टवाळखोरांना तिने चांगलीच अद्दल घडवल्याचं दिसतंय. तरुणीचे मार्शल आर्ट मूव्ह्ज (Martial Arts Moves), फ्लाइंग किक (Flying Kick) पाहून नेटिझन्स अवाक होत आहेत. ‘झी न्यूज हिंदी’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत असं दिसत आहे, की निर्मनुष्य ठिकाणच्या रस्त्यावर मुलगी जात असताना तिला काही तरुण घेरतात. तिची छेड काढत असताना सुरुवातीला ती त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते; पण ते तरुण तिची छेड काढणं थांबवत नाहीत. सहा जणांपैकी काही जण तिला स्पर्श करतात व आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्या मुलीचा पारा चढतो आणि मार्शल आर्टच्या मूव्ह्ज करत, फ्लाइंग किक मारत ती सर्वांना बदडते. त्या साहसी मुलीच्या प्रतिकारासमोर एकही तरुण टिकत नाही. अवघ्या 25 सेकंदांचा हा व्हिडिओ कुठला आहे हे कळलं नसलं तरी तो सोशल मीडियावर सर्वांच्या पसंतीला उतरला आहे. ट्विटरवर ‘फिगन’ (Figen) या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओला ‘डोंट मेस्स विथ द गर्ल! हिय्या…!’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. ( पालक नोकरीला गेल्यानंतर मोलकरणीने दोन वर्षांच्या बाळाला केली जबर मारहाण, व्हिडिओ व्हायरल ) ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही या मुलीच्या धाडसाचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ट्विटरवर आतापर्यंत 35 लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर 9 हजारांहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमधला असून, तो नेटिझन्सच्या प्रचंड पसंतीला उतरला आहे. महिला आजही सुरक्षित नसल्याचं सांगत अनेकांनी यावर रोष व्यक्त केला आहे. एका नेटिझनने तर लिहिलं आहे, की ‘कुठल्याही मुलीला अशा प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी आपल्या कुटुंबातल्या मुलांना समाजवणं, चांगलं शिक्षण देणं आपलं कर्तव्य आहे.’ दुसऱ्या एका व्यक्तीने या मुलीचे धाडस म्हणजे निंजाचं खरं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.
जगातल्या प्रत्येक देशात आजही लाखो महिलांची दररोज छेड काढली जाते. त्यांच्यावरच्या अत्याचाराची मालिका थांबलेली नाही. स्वत:चं संरक्षण कसं करायचं याचं प्रशिक्षण अनेक ठिकाणी दिलं जातं; पण त्यातल्या खूप कमी मुली, तरुणी प्रतिकार करू शकतात. अशा परिस्थितीत, अडचणीच्या प्रसंगात कोणाचीही मदत न घेता स्वत:चं संरक्षण करणाऱ्या व टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडवणाऱ्या या व्हिडिओतल्या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.