भोपाळ, 15 जून : आजकाल बऱ्याच कुटुंबांत पती-पत्नी दोघे नोकरी (Job) करतात. दोघंही वेगळ्या शहरांत राहत असतील आणि त्यांना बाळ (Baby) असेल तर त्या बाळाची काळजी घ्यायला कोणी नसतं, त्यामुळे ते आया म्हणजे बाळाची काळजी घेणारी मोलकरीण ठेवतात. या आया मुलांचा त्यांच्या पालकांच्या अनुपस्थित सांभाळ करतात. परंतु, बाळाचे पालक कामावर गेल्यावर त्याला आयाने वारंवार मारहाण केल्याची एक घटना घडली आहे.
एका निर्दयी महिलेच्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. मुलाला सांभाळणाऱ्या एका आयाने दोन वर्षांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. लहानग्या मुलावर अत्याचार करणाऱ्या या महिलेविरोधात तिच्या मालकाने पोलिसांत (Police) तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक करून तुरुंगात तिची रवानगी केली आहे. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरमध्ये (Jabalpur) एका आयाने दोन वर्षांच्या मुलाला वारंवार मारहाण करत क्रूर वागणूक दिली आहे. मुलाचे वडील मुकेश यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांचा मुलगा गेल्या एक महिन्यापासून नैराश्यात (Depression) होता. तो नीट जेवतही नव्हता. त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेलं असता त्याच्या आतड्यांमध्ये इन्फेक्शन (Infection) झाल्याचं डॉक्टरांकडून कळलं. गुटखा-तंबाखू आणि उष्टे अन्न मुलाला खाऊ घातल्याने त्याला इन्फेक्शन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्याला इन्फेक्शन झाल्याचं ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.
( विधान परिषदेतला पराभव टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी )
यानंतर घरी परतलेल्या मुकेश यांनी सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पाहिलं आणि त्यातलं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. व्हिडिओत रजनी नावाची आया त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. तसंच ती बाळाला नीट दूध पाजत नसल्याचंही दिसलं. झालेला प्रकार पाहून मुकेश यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आरोपी रजनीला अटक करून तुरुंगात तिची रवानगी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे 2 वर्षांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हते. म्हणून 4 महिन्यांपूर्वी या कुटुंबाने चमन नगर येथील रहिवासी रजनी चौधरीला 2 वर्षांच्या मुलाची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलं होतं. त्यानंतर बाळाचे आई-वडिल सकाळी 11 वाजता नोकरीला जायचे. ते कामावर गेल्यानंतर रजनी चौधरी मुलाला मारहाण करायची आणि नीट खाऊ घालायची नाही. मुलाची तब्येत बिघडल्याचं लक्षात येताच पालकांना रजनीच्या वागण्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी खोलीत सीसीटीव्ही लावले होते.
दरम्यान, डॉक्टरांनी मुलाला इन्फेक्शन झाल्याचं सांगताच पालकांनी सीसीटीव्ही तपासले आणि रजनीने बाळाला केलेली अमानुष मारहाण पाहून त्यांना धक्का बसला. लागलीच मुलाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये रजनीविरोधात तक्रार दिली आणि पोलिसांनी तिला अटक केली आहे.