मुंबई, 6 सप्टेंबर: मुलांची नावं हटके ठेवण्याचा ट्रेंड (Trendy Names) वाढत आहे. अलीकडचीच काही उदाहरणं द्यायची झाल्यास कोरोना नावाच्या संसर्गजन्य आजाराची जगाला ओळख झाल्यानंतर छत्तीसगडमधील एका दाम्पत्याने आपल्या जुळ्या मुलांची नावं ‘कोरोना’ आणि ‘कोविड’ अशी ठेवली होती. त्यानंतर भारत-पाकिस्तानच्या सीमेवर एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्याचं नाव ‘बॉर्डर’ ठेवलं होतं. या शिवाय भारताने सीएए कायदा आणल्यानंतर या कायद्याचा फायदा झालेल्या एका महिलेने आपल्या मुलीचं नाव ‘नागरिकत्व’ ठेवलं होतं. अशातच आता आणखी एक असंच प्रकरण समोर आलंय. या वेळी तर एका परदेशी महिलेने आपल्या मुलीचं नाव भारतीय खाद्यपदार्थावरून ठेवलंय.
युनायटेड किंगडममधील एका जोडप्याने अलीकडेच आपल्या नवजात मुलीचं नाव भारतीय पदार्थावरून ठेवल्याची घोषणा केली. या जोडप्याने मुलीचं नाव 'पकोडा' ठेवल्यावर लोकांनी ती बातमी चांगलीच व्हायरल केलीय. पकोडा म्हणजे आपण खातो ती भजी. काही लोकांनी इंटरनेटवर त्यांची खिल्ली उडवली आहे. आता इंटरनेटवरील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणं आवश्यक आहे. कारण ही घोषणा खरी नव्हती तर ब्रिटनमधील एका रेस्टॉरंट मालकाने केलेला विनोद होता. ही घटना उत्तर आयर्लंडमधील 'द कॅप्टन्स टेबल' (The Captains Table) या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील आहे, त्या मालकाने त्याच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.
हेही वाचा- लहान वयातच तुमचं मुलं प्रेमात पडलंय? 'या' पद्धतीनं हाताळा नाजूक परिस्थिती
उत्तर आयर्लंडमधील न्यूटाउनबे येथील सुप्रसिद्ध रेस्टॉरंट ‘द कॅप्टन्स टेबल’ने फेसबुकवर नवजात बाळाचा फोटो आणि एक हृदयस्पर्शी नोट लिहिलेलं बिल शेअर केलंय. या पोस्टमध्ये मुलीचं नाव ‘पकोडा’ असं लिहिलं होतं. या चिठ्ठीत लिहिलं होतं की, 'माझ्या पत्नीने आमच्या नवजात मुलीला पकोडा म्हणून हाक मारली, कारण द कॅप्टन्स टेबलमधील तिचा आवडता पदार्थ पकोडा आहे.' त्या बाळाच्या पित्याने चिकन पकोडा बुरिटो सॅलड, चिकन पकोडा रेग्युलर, असे चार पकोडे ऑर्डर केल्याचं या बिलातून कळतंय. दरम्यान, 'हे पहिल्यांदाच आहे! पकोडा जगात आपलं स्वागत आहे. आता आम्ही तुला भेटण्यासाठी वाट बघू शकत नाही,’ असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
या प्रकरणातील नवजात मुलीचं खरं नाव पकोडा नसून तिच्या आईच्या आवडत्या पदार्थामुळे ती प्रेमाने मुलीला पकोडा म्हणते. यावर रेस्टॉरंटच्या मालकाने याबद्दल फेसबुकवर पोस्ट करताच लोकांना वाटलं की मुलीचं नाव पकोडा आहे आणि ही पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, ‘प्रेग्नन्सीदरम्यान, माझे आवडते पदार्थ केळी, पॉप्सिकल्स आणि टरबूज हे होते. नशीब मी थोडं डोकं लावलं आणि माझ्या मुलांची नावं तशी ठेवली नाहीत.’ तर आणखी एका युजरने ‘मी माझ्या मुलीचं नाव टॅको बेला ठेवलं आहे,' अशी कमेंट केलीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.